खेर्डी : कोकणातील लोककलावंताचे योगदान अपूर्व राहिले आहे. भारुड, नमन, नाटक, तमाशा या व अशा कार्यक्रमातून मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अल्प का होईना मानधन मिळू लागले. मात्र, मार्च महिन्यापासून ते रखडल्याने ऐन गणेशोत्सवात कोकणातल्या कलावंतांचे चेहरे हिरमुसले आहेत. कलाकारांचे रखडलेले मानधन गणेशोत्सवात मिळणार अशा आशयाची वंदता होती. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजे मार्चपासून कोकणातील लोककलावंताचे मानधन रखडले आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या निर्देशानुसार पंचायत समितीतर्फे गत दशकभरापासून हे मानधन लोककलावंतांच्या खात्यात जमा करण्यात येत होते. यानंतर चार महिन्यांपूर्वी राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यातील कलावंतांचे मानधन थेट जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदांना कलाकारांचा बँक क्रमांक, आयएफएससी कोड आदी पाठवण्यास सांगण्यात आले. याच तांत्रिक बाबींच्या पूर्ततेला विलंब झाल्याने सगळ्यांचेच मानधन अडकले. यामुळे अनेक ज्येष्ठ कलावंतांना औषधोपचाराचा खर्च करण्याचे आर्थिक स्थैर्यही दूरापास्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात २७७ व नवीन मंजूर झालेले ४२ असे ३१९ कलाकारांचे मानधन रखडले आहे. बँक पासबुकवरील इंग्रजी नावे व कोड याबाबत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण खात्याचे अधिकारी सोमवार दि. २१ रोजी मंत्रालयात बैठकीसाठी जाणार असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, मानधनाबाबत कलाकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)मानधनात वाढ हवीसमिती निर्मितीत उदासिनता लोककलावंतांना मान्यता देणे तसेच त्यांना विहित श्रेणीत स्थाननिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती काम करते. सन २०१३ला समितीची शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर समितीचे गठन न झाल्याने नवे प्रस्ताव बासनातच आहेत. (अ, ब, क) या श्रेणीनुसार २१००, १८०० व १५०० असे मानधन देण्यात येते.मानधनात वाढ हवी पथनाट्य, शासकीय जनजागृती कार्यक्रम यातून काम करवून घेण्यात येते. व्यसनमुक्ती, निर्मल व स्वच्छ ग्राम, पर्यावरण, आरोग्य यासाठी कलावंत काम करतात. कला व ती सामाजिक संवेदनशीलता जिवंत ठेवायची असेल तर मानधनात वाढ व वेळेवर मानधन अशी अपेक्षा चिपळुणातील नाट्यकलावंत अभय दांडेकर यांनी व्यक्त केली.
कलावंतांचे मानधन अद्याप रखडलेलेच
By admin | Published: September 20, 2015 9:12 PM