वेंगुर्ले : सिंधुदुर्गातील महिला कर्तृत्वाने पुढे जात आहेत. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या कलागुणांना वाव देण्याचाही प्रयत्न महिला करीत असून, ही अभिमानास्पद बाब आहे. आज समाजात बदल होत असून, महिलांना सन्मानाची वागणूक मिळत आहे; पण महिलांनी संसार सांभाळताना स्वत: साठीही वेळ दिला पाहिजे, असे प्रतिपादन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीलमताई राणे यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय महिला काँग्रेसच्यावतीने वेंगुर्ले काथ्या कारखान्यात महिला दिन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी सकाळी भव्य दुचाकी महिलास्वार रॅलीने झाला. दिवसभर महिलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. तसेच महिलांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा, होममिनिस्टर स्पर्धा या स्पर्धांमध्येही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यावेळी व्यासपीठावर नीलमताई राणे यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता बांदेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुमेधा पाताडे, उद्योजक एम. के. गावडे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, महिला तालुकाध्यक्ष सारिका काळसेकर, शहराध्यक्षा गौरी पाटील, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या गौरी मडवळ, साक्षी कुबल, नगरसेविका कृतिका कुबल, कृपा गिरप- मोंडकर, शीतल आंगचेकर, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, वंदना खटावकर, चित्रा कनयाळकर, सूर्यकांता संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, आसोली विकास सोसायटीचे चेअरमन सुजाता देसाई, माजी नगराध्यक्षा पूजा कर्पे, आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नीलमताई राणे म्हणाल्या, काँग्रेसच्या काळात शासनाने महिलांसाठी ३० टक्के आरक्षण नंतर ५० टक्के आरक्षण जाहीर केले. आणि महिलांमधील स्त्री शक्ती जागृत केली. आज सर्वच क्षेत्रांत महिला पुढे गेल्या आहेत. महिलांनी चूल-मूल करीत राहिले, तर आयुष्याच्या शेवटी आपण काय कमावले. याचा हिशोब मांडू तेव्हा मात्र आपल्यालाच आपल्यातील कमतरता जाणवेल. म्हणून आताच महिलांनी संसार करीत असताना स्वत:तील कलागुणांना वाव देण्याची गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वत: कुठच्याही क्षेत्रात पुढे व्हाल तेव्हा कुटुंबीयांना तुमची योग्यता लक्षात येईल. आपण कशातही कमी नाही फक्त त्या-त्या क्षेत्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले तर आपणही सक्षमपणे उभे राहू शकतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाची सांगता विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाने झाली. नीलमताई राणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.यावेळी सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गौरी मराठे, सूत्रसंचालन एम. के. गावडे, यांनी तर प्रज्ञा परब यांनी आभार मांडले. (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान हा आदर्श समाजाचे द्योतक
By admin | Published: March 10, 2017 10:11 PM