वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी मंगळवारी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वेंगुर्ले समुद्र किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळामुळे समुद्र्रात फसलेल्या गस्ती नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यास मदत केलेल्या मच्छिमारांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात मालवण, कुडाळ त्यानंतर मंगळवारी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देत त्यांनी तपासणी केली.
अधीक्षक गेडाम यांचे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी स्वागत केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, पोलीस उपनिरीक्षक नाईक, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सारंग आदी उपस्थित होते.
यावेळी अधीक्षक गेडाम यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील गुन्हे, प्रलंबित गुन्हे यांचा आढावा घेतला. त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील स्थानिक मच्छिमार, सागररक्षक सदस्य, पोलीस पाटील यांची बैठक घेतली.
या बैठकीत कोकण किनारपट्टीवर आलेल्या ओखी वादळात मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल, पोलीस पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावत समुद्र्र किनारी भागामध्ये सतर्क राहून वादळात होणारी नुकसानीची तीव्रता कमी केली त्याचे आभार यावेळी गेडाम यांनी मानले व भविष्यात अशाच प्रकारे कामगिरी करण्याचे आवाहन केले.
वेंगुर्ले बंदर येथील समुद्र्रात पोलीस विभागाची गस्ती नौका वादळात सापडली होती ही गस्ती नौका नियोजनबद्धरित्या, धैर्याने व साहसाने वादळातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्याकरिता मच्छिमार झुजय फर्नांडिस, मोहन सागवेकर, गुंडू खोबरेकर, कामिल फर्नांडिस (रा. दाभोसवाडा-वेंगुर्ले) यांचा तसेच सागरी विभाग सागरकन्या नौकेवरील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सारंग यांचा गेडाम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. ओखी वादळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिसांचाही गौरव करण्यात आला.