महेश सरनाईक / सिंधुदुर्ग मुंबई-गोवा जलवाहतुकीचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे विविध ठिकाणच्या जलवाहतुकीबाबत प्रस्ताव मागितले होते. यास उद्योजकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, डझनभर प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला प्राप्त झाले आहेत. सध्या या प्रस्तावांची छाननी सुरू असून महिन्याभरानंतर जलवाहतुकीसाठी उत्सुक उद्योजकांची निवड करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळी हंगाम संपताच आॅक्टोबर महिन्याच्या आसपास कोकण किनारपट्टीवर दिवाळी साजरी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोकणातील बंदरातून जलवाहतूक सुरू व्हावी म्हणून बंदर अभ्यासक आनंद हुले गेली दहा वर्षे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आघाडी शासन असताना आणि आता युती शासन आल्यावर त्यांनी आपला पाठपुरावा कायम ठेवला आहे. शुक्रवारी त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक आरोसकर यांची मुख्यालयात भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान, मुंबई-पणजी सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा चालविण्यासाठी तसेच सिंधुदुर्गातील बंदरे बहुद्देशीय म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सकारात्मक आहे हे स्पष्ट झाले. येत्या काही वर्षात मालवणवासीयांचा लाडका ‘भाऊचा धक्का’ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवासी टर्मिनल होणार आहे. तब्बल चाळीस वर्षांनंतर बोटीचा भोंगा सिंधुदुर्गातील बंदरात वाजेल तेव्हा समस्त मालवणवासीयांची मने भरून येतील, असा आशावाद यानिमित्ताने निर्माण झाला आहे. ‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा बंदर अभ्यासक आनंद हुले यांच्या प्रयत्नांना वाचा फोडत मुंबई-पणजी ही रो-रो सेवा सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. जलवाहतुकीतून होणारे फायदे आणि कोकणातील बंदरांच्या होणाऱ्या पुनरुज्जीवनाबाबत ‘लोकमत’ने कायमच आवाज उठविला आहे. या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
जलवाहतुकीच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 12:42 AM