संदीप बोडवेमालवण: भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) माध्यमातून मालवण येथील बहुचर्चित सागरी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागांचा शोध पूर्ण झाला आहे. याबाबतचा मसुदा डब्ल्यूआयआयने वनविभागाच्या कांदळवन कक्षाला सादर केला आहे. लवकरच यावर अंतिम अहवाल तयार करण्यात येणार असून, तो मंजुरीसाठी शासनासमोर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मालवण सागरी अभयारण्य (एमएमएस) निर्माणाच्या ३३ वर्षांनंतर प्रथमच या अभयारण्याबाबत दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार एमएमएसच्या सीमेबाबत पुनर्विचार करण्यात येत आहे.तेहतीस वर्षांपूर्वी ठरविलेल्या एमएमएसच्या गाभा क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये सागरी पर्यटन व मासेमारीवर आधारित उपजीविकेचे उपक्रम सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अभयारण्याच्या सीमेबाबत फेरविचार करणे आवश्यक होते.महाराष्ट्र सरकारच्या १९८७ च्या अधिसूचनेनुसार ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग सभोवताली २९.१२ वर्ग किमी सागरी क्षेत्रात सागरी अभयारण्य घोषित करण्यात आले होते. मात्र, भारतीय वन्यजीव संस्थांच्या तज्ज्ञ अभ्यास गटाने २०१७-१८ मधील ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ नॅशनल पार्क अँड वाइल्ड लाइफ सेंच्युरिज इन इंडिया’ या अहवालात मालवण सागरी अभयारण्याची मांडणी सदोष ठरविली होती.मालवण मरीन सेंच्युरीच्या सीमेचा पुनर्विचार करताना सर्वप्रथम अभयारण्याच्या आसपासच्या सागरी परिक्षेत्रातील महत्त्वाच्या सागरी जैवविविधतेच्या जागांचा शोध घेणे गरजेचे होते.डब्ल्यूआयआयने कांदळवन विभागाला एमएमएसच्या अभ्यासाअंती अंतिम मसुदा सादर केला आहे. यावर कांदळवन विभाग डब्ल्यूआयआयला अभिप्राय देणार आहे. त्यानंतरच अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे डब्ल्यूआयआयचे संचालक वीरेंद्र तिवारी म्हणाले.एमएमएस मध्ये ३.१८२ चौरस किमी कोअर आणि २५.९४ चौरस किमीचे बफर क्षेत्र आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, पद्मगड बेट, धरण पॉइंट, चिवला बिच, क्लासरूम, सरसॅगम फॉरेस्ट, कवडा रॉक, किंग्स गार्डन वन, टू थ्री रॉक गार्डन, ऐकल्याचा धोंडा, आदी पाण्याखालील खडकाळ भाग आणि वालुकामय समुद्रकिनारे यांचा समावेश आहे.सिंधुदुर्गच्या सागरी परिसंस्थेमधील पाण्याखालील खडकाळ भाग, खाडीमुख आणि कांदळवनसारख्या वैविध्यपूर्ण अधिवासात ३६७ पैकी ३३१ सागरी प्रजाती नोंदलेल्या आहेत, ज्यात १८ प्रवाळ प्रजातींचा समावेश आहे.
Sindhudurg News: बहुचर्चित मालवण सागरी अभयारण्य हॉटस्पॉटचा अभ्यास पूर्णत्वाकडे, ३३ वर्षांनंतर प्रथमच पुनर्विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:56 PM