आंबोली : वर्षा पर्यटनाच्या तिसऱ्या रविवारी आंबोलीमध्ये पर्यटकांचा महापूर उसळला होता. सुमारे ७० ते ८० हजार लोकांनी आंबोलीमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.आंबोलीत रविवारी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी उसळली. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आंबोली मुख्य धबधबा ते नांगरतास फाटा या चौदा किलोमीटरच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. १२३ पोलीस व ५ अधिकारी यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होते. परंतु पोलीसही या गर्दीपुढे हतबल दिसून आले.
आंबोलीत गर्दीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.आंबोली बाजारपेठ जकातवाडी या परिसरामध्ये यावेळी वाहने उभी करण्यात आली होती. सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता पायी चालत जाऊन पुन्हा पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेतला. यावेळी वृद्ध तसेच लहान मुले, कुटुंबवत्सल पर्यटकांचे अतोनात हाल झाले. परंतु पर्यटकांची संख्या पाहता पर्यटकांच्या गाड्या घाट रस्त्यावरुन खाली सोडणे म्हणजे अतिशय चुकीचे व धोकादायक ठरले असते. त्यामुळे घाटमाथ्यावर मोठी वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. आंबोलीच्या इतिहासातील रविवारचा दिवस सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही अनुचित प्रकाराविना यशस्वीरित्या पार पडला.