साटेली भेडशी : दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर-काजूळवाडी येथील संतोष सखाराम पेडणेकर यांचे राहते घर आगीत जळून खाक झाले. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष पेडणेकर यांचे काजूळवाडी येथे चिऱ्यांचे कौलारू घर आहे. ते पत्नी सुजाता व मुलगी संध्या यांच्यासोबत राहतात. त्यांनी अलीकडेच मोलमजुरी करून घराचे बांधकाम पूर्ण केले होते. मोलमजुरीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते. संतोष यांची मुलगी संध्या पिकुळे हायस्कूलमध्ये नववीत शिकते. शुक्रवारी सायंकाळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने संध्या ही कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती आई-वडिलांसोबत रात्री साडेआठ वाजता शाळेत गेली. कार्यक्रम चालू असताना रात्री १० वाजता पेडणेकर यांच्या घरास आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी संतोष यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी शेजाऱ्यांनी एकच धावपळ केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत घर व घरातील बहुतांश भाग जळून खाक झाला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी तलाठी कांचन गवस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानुसार पाच लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली. यावेळी झरेबांबर सरपंच सुरेखा जंगले, उपसरपंच अनिल शेटकर, ग्रामपंचायत सदस्य उल्हास गवस, माजी सरपंच पांडुरंग गवस, काशीनाथ शेटकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आणि स्वप्नांची राख झाली....संतोष पेडणेकर सध्या गोवा येथील एका खासगी हॉटेलमध्ये कामास होते. कामावरून मालकाकडून आणलेले २० हजार रुपये, मित्राकडून उसने घेतलेले ३० हजार व घरात जमवून ठेवलेले २० हजार असे एकूण ७० हजार रुपये त्यांनी घरातील कामासाठी आणून ठेवले होते. ही रक्कम ज्या कपाटात होती ते कपाट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मुलीचे पुढील शिक्षण तसेच उच्च शिक्षण यासाठी मुलीच्या नावे पैसे ठेवण्याचा त्यांचा विचार होता. दुर्दैवाने त्यांची सर्व स्वप्ने आगीत भस्मसात झाली. नुकतेच बांधलेले घर आणि घरातील रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेडणेकर यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
झरेबांबर येथील घर आगीच्या भक्ष्यस्थानी
By admin | Published: December 13, 2015 12:43 AM