सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे बेसुमार वृक्षतोड झाली आहे. लोकांच्या तक्रारी असूनही वनखात्याने वृक्षतोडीचा परस्पर सर्व्हे केला. सर्वेक्षण करताना लोकांना सोबत घ्यायला हवे होते; तसे केले नाही. त्यामुळे पुनश्च सर्वेक्षण करून वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. दंड करून भागणार नाही, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला. उद्धवसेना याविरोधात जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.उपवनसंरक्षक कार्यालयात सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल संजय कुंभार यांना सासोली येथील सामायिक जमिनीतील बेसुमार वृक्षतोडीवरून पारकर यांनी सहायक वनसंरक्षक यांना चांगलेच धारेवर धरले.सहा हजार झाडे तोडण्यात आली असून, त्यासाठी वीस लाख रुपये दंड केला आहे. तो दंड कमी आहे. हा दंडही जमा केलेला नसल्याने या जमिनीच्या सातबारावर वनविभागाचे नाव नोंद करण्याबाबत आम्ही महसूल विभागाला कळविले असल्याचे बोराटे यांनी संदेश पारकर यांना सांगितले.यावर पारकर म्हणाले, दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह झोनअंतर्गत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात व्याघ्र कॉरिडॉरअंतर्गत नोंद असल्याने वृक्षतोडीवर बंदी असताना या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करूनही वनखाते फक्त दंडात्मक कारवाईचीच पावले उचलत आहे. उलट संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सामायिक जमिनीत संबंधिताची जमीन नेमकी कुठे आहे हे अजून निश्चित झाले नाही. या जमिनीचा सातबारा, आकारफोड पत्र, बोटखतात सामायिक जमीन अशी कागदपत्रे आहेत. त्यामुळे वन खात्याने सातबारावर बोजा चढवण्याची महसूलकडे केलेली मागणी बेकायदेशीर आहे. हे आपल्याला चुकीचे वाटते, असे ते यावेळी म्हणाले. वनखात्याने बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, संघटक शब्बीर मणीयार उपस्थित होते.
Sindhudurg: सासोलीत बेसुमार वृक्षतोड करून २० लाख दंड कसा?, संदेश पारकर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:13 PM