महेश सरनाईक/सुधीर राणे -कणकवली (सिंधुदुर्ग) : भाजपाने अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले असते तर त्यांच्या विरोधात ते बोलले असते काय? त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली. भाजपवाले म्हणे गुजरातला उद्योग नेत आहेत. मात्र, साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा त्यांनी भाजपला विरोध का केला नाही? कोकणात उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी उद्योग का आणले नाहीत, असा हल्लाबोल ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत केला.‘महायुती’चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उमेदवार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजू पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
केवळ तोडपाणीसाठी विरोधराज ठाकरे म्हणाले, भाभा रिसर्च सेंटर मुंबईत आहे. तिथे कधी स्फोट झाल्याचे ऐकिवात नाही. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बारसुला हा प्रकल्प करण्यास संमती दर्शविली. तिथे पाच हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली? आधीच यांच्या लोकांनी तिथे जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. यामागे खासदार विनायक राऊत यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
कोकण रेल्वेच्या वेळी दलाल नव्हतेते म्हणाले, कोकण रेल्वे याच कोकणातून गेली. ही रेल्वे होताना आजच्यासारखे जमिनीचे दलाल येथे नव्हते. त्यामुळे त्यावेळी विरोध झाला नाही. गोव्यात सगळे जण फिरायला जातात. गोव्यात जे बीचवर दिसते ते कोकणात दिसले तर आमची संस्कृती खराब होते, अशी बोंब मारली जाते. मात्र, दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही, ती संस्कृती काय कामाची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
ॲमेझॉन नंतर कोकण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदेशते म्हणाले, ॲमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण आहे. येथे हॉटेल इंडस्ट्री व इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणले तर कोकण विकास निश्चितच होईल. केवळ ६ महिने मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी झपाटल्यासारखी विकासकामे केली. जर पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर आज राणेंच्या प्रचाराची गरजच नव्हती. महाराष्ट्रात ९ भारतरत्न आहेत, त्यातील ७ भारतरत्न हे कोकणातील आहेत. कोकणी जनता ही सुजाण आणि सुज्ञ आहे.
मोदींना पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलीच सभा
मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिलीच जाहीर सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट नाही पटली तर त्याला विरोध करतो. २०१४, २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या काही गोष्टी मला नाही पटल्या. त्या आजही नाही पटत. मात्र, आज विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मी पाठिंबा दिला आहे. काश्मीरमधील रद्द केलेले ३७० कलम, अयोध्येत कारसेवकांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, त्यांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली. तेव्हापासून राम मंदिर प्रश्न भिजत पडला होता. आता नरेंद्र मोदींचे सरकार असताना न्यायालयाकडून राम मंदिर बांधण्याची परवानगी मिळाली आहे.चौकट
२० वर्षांनंतर राणे, ठाकरे एकाच व्यासपीठावर!लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत शनिवारी घेतली. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे व नारायण राणे तब्बल २४ वर्षांनंतर प्रथमच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे ते नेमके काय बोलणार, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांनीही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली.