‘काय रे, आवाज इतका कसा बदलला? काही औषध घेतलस की नाही?’ या माझ्या प्रश्नावर माझ्या एका विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तराने मला विचार करायला प्रवृत्त केलं. तो म्हणाला, ‘औषधाचा काही परिणाम होणार नाही. रात्री थंडीतून गाडीवरून येतो. त्यामुळे सर्दी होते. रात्री उशिरापर्यंत एकांकिकेचे प्रॅक्टीस चालते.’ यानंतर माझी विचारांची शृंखला अनेक विषयांत गुंततच गेली. नोव्हेंबर महिना लागला की, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यात एकांकिका स्पर्धाही असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर प्रत्येक तालुक्यातून, काही गावांतूनही अशा स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. गावागावांतून काही ठिकाणी, तर वाडीवाडीतून स्पर्धक संघ तयार होतात. काही तरुण एकत्र येतात. त्यांचा गु्रप बनतो. त्यातून मंडळ स्थापन होणं, एकांकिका बसवणं हे सगळं घडत जातं. पण, एकांकिका बसवणं हे तितकसं सोपही नसतं. अनेक एकांकिकांमधून चांगला विषय घेऊन निवड करणं, त्यासाठी एकांकिकांचे वाचन करणे, एकांकिके ची निवड झाल्यानंतर पात्र निवड करणे, प्रॅक्टीस घेणे, नेपथ्याचा, प्रकाश योजनेचा विचार करणे, आदी अनेक गोष्टी असतात. स्पर्धेत उतरल्यावर सर्वांना घेऊन स्पर्धेच्या जागी पोहोचणे, सामान नेणे-आणणे हे सर्व खूपच जिकिरीचं काम असतं; पण तरीही कलेशी इमान बाळगणारे ग्रामीण भागातील निष्ठावंत कलाकार या सर्व अडथळ््यांची शर्यत पार करतात. ग्रामीण भागातल्या अशा कलाकारांच्या कलानिष्ठेला मन:पूर्वक प्रणाम करावासा वाटतो. या एकांकिकांमधून भाग घेणाऱ्या कलाकारांना नोकरी किंवा व्यवसाय असतात. काहींना संसार असतात. हे सर्व सांभाळून ते तारेवरची कसरत करीत असतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक झीज सोसावी लागते. स्पर्धेत नंबर मिळाला, तर निदान नाव तरी होतं. पण नंबर नाही मिळाला तर! पण तरीही हे निष्ठावंत कलेचे उपासक निराश होत नाहीत. अपयशाने खचून जाऊन नाटकच सोडले, असे घडत नाही. त्यांच्या हृदयातील नाट्यपे्रेम पुढील वर्षी अधिक जोमाने तरारून येते. स्पर्धेतील यश-अपयशाचा त्यांच्या कलानिष्ठेवर परिणाम होत नाही. एवढी सगळी झीज सोसून या कलाकारांना काय मिळते? खरं म्हणजे त्यांना काही मिळवायचे असते, म्हणून ते भाग घेत नाहीत. तर कोणत्याही दृश्य प्राप्तीपेक्षा अधिक त्यांना मिळत असते. ते म्हणजे त्यांना मिळणारा कलानंद. तो दाखवता येणार नाही. तो कोणापासून हिरावून घेता येणार नाही. या सर्व कलाकारांना त्यांचं स्वत:चं असं आयुष्य नसतं का? त्यांना काहीच दु:ख, समस्या नसतातच का? त्यांना संसारिक अडचणी नसतात का? पण थोड्या वेळासाठी हे कलाकार आपली सगळी दु:खाची ओझी उतरवून ठेवतात. नाटकातल्या भूमिकेत शिरताना त्यांना परकाया प्रवेश करावा लागतो. तो करीत असताना आणि स्वत्वाचा कोष फोडून बाहेर पडताना सात्विक आनंद मिळत असतो. त्यातून मन प्रसन्न आणि संपन्न बनते. या आनंदापुढे जगातले ऐहिक आनंद फिके असतात. नाटकात काम करताना एका वेगळच विश्वात, एका वेगळ्याच धुंदीत शिरतात. जगाचा, दु:खाचा आणि स्वत:चाही विसर पडतो. याच उत्कट आनंदासाठी कलाकार सर्व प्रकारची झीज सोसत आहेत. नाट्य या कलेचा उगम संस्कृत वाङमयात आढळतो.भरत मुनींच्या नाट्य कल्पनेनंतर आजपर्यंत त्यात अनेक स्थित्यंतरे घडली. अनेक रुपे बदलली. तरी कल्पनेचा मूळ गाभा तोच आहे. आज हजारो वर्षे नाट्य कला जी जिवंत आहे, ती अशा कलाप्रेमी लोकांमुळेच. स्वत:ला विसरून झोकून देऊन, निरपेक्ष भावनेने कलेची उपासना करणाऱ्या अशा भक्तांमुळेच कला जिवंत आहे आणि पुढे ती फोफावतेही आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून असे अनेक संघ आहेत. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत, प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आपले नाट्यप्रेम जोपासत आहेत. आज सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्या मातीत रुजलेली नाट्यकला गावोगावी फांद्यांसह पोहोचलीय. ती फोफावतेय. आकाश स्पर्शाचं स्वप्न पाहतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकलेच्या अशा सर्व उपासकांना अंत:करणपूर्वन लीनतेने प्रणाम! त्यांच्याविषयी मनात उचंबळणाऱ्या भावना शब्दातून नक्की कशा मांडाव्यात, मला समजत नाही. पण नाट्य क्षेत्रासाठी ग्रामीण भागातील नाट्य कलावंतांचे हे योगदान फार मोलाचे आहे. सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा! स्पर्धा भरवून होतकरू कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांचे कार्यही खूप मोलाचे आहे.
‘काय रे, आवाज इतका कसा बदलला? काही औषध घेतलस की नाही?’
By admin | Published: December 08, 2014 9:00 PM