सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी शासकीय कामांवर बहिष्कार घातला आहे. असे असताना बाहेरचे ठेकेदार येऊन जिल्ह्यात काम करीत आहेत. हे जर वेळीच थांबले नाही, तर भाजप युवा मोर्चा ही सर्व कामे बंद पाडतील आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निशांत तोरस्कर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सदस्य शैलेश तावडे, शहर अध्यक्ष आनंद नेवगी, महेश पांचाळ, राजू गावडे, अमित परब, गुणाजी गावडे, आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी निविदा न भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बांधकाम विभागाने अलीकडेच मोठ्या प्रमाणात निविदा काढल्या. या निविदा कोल्हापूर व रायगड येथील ठेकेदारांनी भरल्या आहेत. याला येथील काही ठेकेदार तसेच प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी जबाबदार आहेत. मात्र, स्थानिक ठेकेदाराला डावलून असे करणे योग्य नाही. आज स्थानिक ठेकेदार बेरोजगार करून परजिल्ह्यातील ठेकेदारांना येथे काम करायला कसे काय दिले जाते, असा सवाल भाजपने उपस्थित केला. सावंतवाडी तालुक्यात खडी नाही, वाळू नाही. मग ही कामे होणार कशी, असा सवाल करीत जिल्ह्यात ६६ कोटींची कामे मंजूर झाली. त्यातील ३३ कोटींची कामे सावंतवाडी तालुक्यात आहेत. यातील एक कोटीच्या कामांची निविदा काढण्यात आली असून, ती कामे बाहेरील ठेकेदारांनी घेतली आहेत. ही कामे आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला. प्रसंगी रस्त्यावर उतरून गावागावांत जाऊन जनजागृती करू, असे ही त्यांनी सांगितले. जे दोन ठेकेदार बाहेरून आले आहेत, त्यांच्यासाठी बांधकाम विभागाच्या प्रशासनाने नियमात शिथिलता आणली आहे. हे ठेकेदार अधिकाऱ्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळेच हे नियम वाकवून कामे केली जाणार आहेत. त्यात स्थानिक ठेकेदार उपाशी राहील. मग बँकेचे हप्ते तसेच कर्नाटकमधून कामासाठी आणलेली माणसे यांचे पैसे कोण देणार? त्यामुळे ठेकेदारांनी दिलेल्या निवेदनाचा विचार व्हावा व त्यातून मार्ग निघावा, अशी मागणी आम्ही बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे करणार असल्याचेही भाजपच्यावतीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) परजिल्ह्यातील ठेकेदार व नेत्यांचे रॅकेट स्थानिक ठेकेदारांनी कामावर बहिष्कार घातला असतानाही बाहेरचे ठेकेदार जिल्ह्यात येऊन कामे करतात. हे कसे काय, असा सवाल करीत स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचे बाहेरच्या ठेकेदारांशी साटेलोटे असून, त्यांना काही ठेकेदारही मदत करतात, असा आरोप यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
बाहेरचे ठेकेदार जिल्ह्यात कसे?
By admin | Published: October 02, 2016 11:31 PM