कणकवली : शिवसेना सहभागी असलेल्या केंद्र व राज्य सरकारने एलईडी मासेमारीबद्दलचे एवढे कडक कायदे केल्यानंतरही आज राजरोस पद्धतीने मालवण किनारपट्टीवर एलईडी मासेमारी करण्याची हिंमत होतेच कशी? याचे उत्तर शिवसेनेच्या नेतेमंडळींनी द्यावे, असे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांना आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे.राणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील मच्छिमारांची आजची अवस्था आणि दुर्दशा शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री व खासदार यांनी केली आहे. ज्या किनारपट्टीवरील मतदारांच्या मतांमुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार २०१४ च्या निवडणुकीत निवडून आले, ज्या मच्छिमारांनी शिवसेनेला मते दिली त्या मच्छिमारांवर पोलिसांची दडपशाही वाढत चालली आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्या सहाय्यक मत्स्य आयुक्त वस्त यांची बदली करण्याचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत त्याच वस्त यांना पाठीशी घालण्याचे काम आमच्या मच्छिमारांबरोबरच्या आंदोलनावेळी नाईक व पालकमंत्री यांनी केले होेते. तेव्हा जवळचा वाटणारा अधिकारी वस्त आज शत्रू कसा झाला? याचे उत्तर आमदारांनी जनतेला द्यावे असे आवाहन राणे यांनी केले आहे.मच्छिमारांबद्दल आस्था व प्रेम असेल तर मच्छिमारी कायमस्वरुपी नष्ट करणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करून मच्छिमारांबद्दलचे प्रेम सिद्ध करा, असा सल्ला राणे यांनी नाईक यांना दिला आहे. किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छिमारांना स्थानिक प्रशासन व शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींकडून कोणतेही संरक्षण किंवा आधार मिळत नसल्यामुळे मच्छिमारांची ही अवस्था झाली आहे, असे मतही आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले आहे.