सावंतवाडी : कितीही खोटी कागदपत्रे आणा, आम्ही सत्य काय ते जनतेसमोर आणूच. तसेच जेटी परिसरात कांदळवन नाही म्हणून सांगता, मग प्रकल्पापुरतेच कांदळवन वाढले नाही का? आणि इतरत्र कांदळवन वाढले, हा कसा निसर्गाचा चमत्कार, असा सवाल काँग्रेसने केला. माजी आमदार राजन तेली यांनी मंगळवारी काँग्रेसवर केलेल्या टिकेला काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, काँग्रेस नेते संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब यांनी उत्तर दिले. आम्ही गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यांना आठ दिवसांची मुदत देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी काँग्रेसच्यावतीने प्रवक्ते डॉ. परूळेकर म्हणाले, माजी आमदार राजन तेली बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. भिंत काढणार नाही, असे म्हणणाऱ्या तेलींंना ती भिंत काढावीच लागेल. मेरीटाईमचा रस्ता म्हणता, मग त्यावर बांधकाम विभागाने आतापर्यंत खर्च कसा टाकला आणि जेटीपुरते फक्त कांदळवन आले नाही आणि इतर ठिकाणी कांदळवन कसे आले? आमच्याकडे पाच वर्षांपूर्वीचे उपग्रह नकाशे असून त्या ठिकाणचे पंचनामेही उपलब्ध आहेत, असेही यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर म्हणाले.आतापर्यंत दुसऱ्या कायद्याच्या गोष्टी सांगणाऱ्या तेलींना स्वत:साठी कायदा वापरावा लागला आणि वाचावा लागला, यातच सर्व काही आले, असे सांगत राणेंना नेहमी फसवून ही जेटी लादली. पण आता चक्क भितंच घातल्याने काँग्रेसने या प्रकरणात लक्ष घातले आहे, असे डॉ. परूळेकर यांनी स्पष्ट केले. संदीप कुडतरकर म्हणाले, प्रत्येकाची दिशाभूल करण्यात तेली माहीर आहेत. आम्ही आरोंदावासीयांच्या मागे असून त्यांनी उद्या जेटी हवी आहे, असे म्हटल्यास आम्ही आंदोलनातून माघारही घेऊ. पण त्यांनी आंदोलन केल्यास त्यांना पाठींबा देणे आमचा अधिकार आहे. तेलींनी कितीही खोटी कागदपत्रे सादर करावीत, त्यांना उत्तरे देण्याची आमची तयारी असून ज्या पातळीवर आरोंदा जेटीला विरोध करावा लागेल त्या पातळीवर विरोध करू. भले त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असा इशाराही संदीप कुडतरकर यांनी दिला.निवडणुकीत आरोंदा गावात काँग्रेसला कमी मते पडली, असा जो आरोप आहे. त्यावर कुडतरकर म्हणाले, तेलींनी धनशक्तीच्या जीवावर ही निवडणूक लढविली. प्रत्येक देवळात जाऊन पैसे वाटले गेले. त्यामुळे मते पडणारच. परंतु आता जेटी हवी की नको, यासाठी मतदान घेतल्यास ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल, असा टोलाही यावेळी कुडतरकर यांनी हाणला. आरोंदा जेटीवरून माजी आमदार राजन तेली राजकारण करत आहेत. असा गंभीर आरोपही यावेळी संदीप कुडतरकर यांनी बोलताना केला. (प्रतिनिधी)तंटे करण्यासाठीच तेलींनी जेटी आणली : आचरेकरकाँग्रेस पक्ष जेटी बंद करू शकत नाही. नारायण राणेच जेटी बंद करू शकतात, असे मत आरोंदा गावचे सरपंच आत्माराम आचरेकर यांनी मांडले. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली आहे. जेटीची बांधकामे झाली आहेत, त्यांना ग्रामपंचायतने कधी ही परवानग्या दिल्या नाहीत. त्यामुळे तंटे निर्माण करण्यासाठीच राजन तेलींनी आरोंद्यात जेटी आणल्याचा आरोपही आचरेकर यांनी केला आहे. या पत्रकात आत्माराम आचरेकर यांनी म्हटले आहे की, राजन तेली यांनी नारायण राणे यांची जेटी असल्याचे भासवले. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला नाही. आतापर्यंत तीनदा नोकऱ्या देणार म्हणून मुलाखती घेतल्या, पण एकालाही नोकरी दिली नाही. तेली यांनी तंटे करण्यासाठीच आरोंदा येथे जेटी आणली असून काँग्रेसची जेटी असल्याचे भासवल्यानेच काँग्रेसला आरोंदा येथे मताधिक्य कमी पडल्याचे आचरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकल्पापुरतेच कांदळवन कसे नाही?
By admin | Published: December 17, 2014 10:01 PM