कणकवली : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवर बाहेरून आलेल्यांना पद देता, असा आरोप करतानाच संजय राऊत मुक्ताफळे उधळत आहेत. मग, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती कडवट शिवसैनिकांना त्यांनी पदे दिली होती? जेव्हा खासदारकी, आमदारकी, सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद द्यायची वेळ आली, तेव्हा निष्ठावंत शिवसैनिकांची कुटुंबे त्यांना आठवली नाहीत. तेव्हा बाहेरचे लोकच त्या पदांवर बसवले. आता संजय राऊत जे बोलतात ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.कणकवली येथे रविवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे दुकान आता बंद झाले आहे. हे त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे भाजपात प्रवेश करत आहेत.
पक्ष संपलेल्यांनी भाजपाला संपवण्याची भाषा करू नयेप्रकाश आंबेडकर यांनी ‘मातोश्री’वर फोन लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी फोन घेतला नाही. त्यांचा अपमान केला, अशी आमच्याजवळ माहिती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना तासनतास बसवून ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब या लोकांना महत्त्वाचे वाटत नाही. त्यांचा हे नेहमी अपमान करत आहेत. ठाकरे सेना शरद पवारांची बी टीम झाली आहे. अशा पक्ष संपलेल्यांनी भाजपाला संपवण्याची भाषा करू नये.भाजपा ही भारताची ओळख झाली आहे. भारताचा अभिमान टिकवून ठेवणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा आहे. जे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांच्या पक्षात डावलले जात असेल तर त्यांना मानसन्मान मिळण्यासाठी त्यांनी भाजपात यावे, असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असेल तर ते योग्यच आहे.
पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावेपोलिसांच्या पत्नी या आमच्या भगिनी आहेत. त्यांना मी खुले पत्र लिहीन, ते वाचल्यानंतर त्यांचे मत नक्कीच बदलेल, असे एका प्रश्नावर नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले, जिल्ह्यात सापडलेले बांगलादेशी इथे आले कसे? त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम पोलिसांनी करावे. पोलिसांनी बांगलादेशी, रोहिंगे यांना पकडले. ही कारवाई त्यांनी केली. त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, या घटनेच्या मुळाशी जावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.