सावंतवाडी: पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यात अनेक विकास कामे केली जात आहेत. ती कामे निकृष्ट झाल्याचा संशय आहे. त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळा गावडे, आबा सावंत, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आबा केरकर,रमाकांत राऊळ योगेश गावडे, अशोक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राऊळ म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी आला पाहिजे कामे ही व्हावीत पण 15 मे नंतर डांबरीकरण करायचे तर सर्व सामान्य माणसाला नियम दाखवतात मग आता कशी काय कामे सुरू आहेत या कडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व कोट्यावधीचा निधी आणणाऱ्या लक्ष द्यावा,असा ही टोला मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा महिन्यापूर्वी कार्यारंभ आदेश मिळालेल्या कामांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे पावसाच्या तोंडावर ही कामे केली जात आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.धाकोरे येथे सुरू असलेल्या कामावर थंड हॉट मिक्स घालून रस्ता बनवण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काम रोखण्यात आले. चौकुळ मध्ये सुद्धा हाच प्रकार घडला.
अशाप्रकारे ठेकेदारांकडून चोरी-लबाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याचा फटका रस्त्यांना बसणार आहे. जे रस्ते चार वर्ष टिकले पाहिजे ते चार महिने सुद्धा टिकताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कामांची पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून चौकशी करावी व त्यांची बिले रोखून धरावीत, आपण कोट्यावधीचा निधी आणला असे सांगून मंत्री केसरकर हे बाता मारत आहेत. परंतु निधी आणला पण तो जर मातीत जात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल केला. या ठिकाणी मोती तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र चार दिवस मशीन एका ठिकाणी उभी करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली.