सावंतवाडी : आजगाव धाकोरे दशक्रोशी मधील लोह खनिज आणि मालवण चिंदर येथील सिलिका मायनिंग प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका जाहीर करावी. आजगाव येथे नियोजित मायनिंग प्रकल्प क्षेत्रात केसरकर कुटुंबियांची शंभर एकर जमीन आहे. त्यामुळे जनतेला त्यांची भूमिका समजली पाहिजे असा गंभीर आरोप उध्दव सेनेचे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले,आजगाव धाकोरे दशक्रोशी मध्ये लोह खनिज ड्रोन सर्वेक्षणाला जनतेने विरोध केला. या ठिकाणी लोह खनिज सर्वेक्षण आणि लोह खनिज प्रकल्प होऊ नये अशी जनतेची मागणी आहे त्यांच्या पाठीशी उध्दव सेना खंबीरपणे उभी राहणार आहे. शिक्षण मंत्र्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे दुर्भाग्य समोर आले.तसेच केसरकर यांनी आजगाव धाकोरे नाणोस ,मळेवाड, आरवली अशा दशक्रोशी मधील गावांना ड्रोन सर्वेक्षण करून वाऱ्यावर सोडले आहे. कंपनी ड्रोन सर्वेक्षण करणार होती ती कंपनी ग्रामपंचायतींना नामधारी पत्र देऊन ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरू केले असा आरोप ही राऊत यांनी केला आहे.वेंगुर्ले सावंतवाडी तालुक्यातील बारा गावात या मायनींगचा प्रभाव आहे .जमीन मालक, ग्रामपंचायत यांची परवानगी त्यांना नको आहे. मालवण तालुक्यातील चिंदर मध्ये सिलिका मायनिंगचा प्रकल्प राबविला जाणार आहे.केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघांमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत आपली भूमिका जाहीर करावी. या मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. चिंदर गावातही सिलिका मायनिंग होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. शिंदे सरकारने घिसाडघाई करून सर्वेक्षण करण्यासाठी कंपनीला परवानगी दिली .त्याचा जनता धिक्कार करत आहे असे ते यावेळी म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अँड कौस्तुभ गावडे उपस्थित होते.
आजगाव खनिज प्रकल्प क्षेत्रात मंत्री केसरकर कुटुंबियांची शंभर एकर जमीन, विनायक राऊत यांचा आरोप
By अनंत खं.जाधव | Published: July 15, 2024 2:34 PM