खारेपाटण (सिंधुदुर्ग) : जंगलात शिकारीला गेलेल्या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. नितीन सुभाष चव्हाण (वय-३८, खारेपाटण गुरववाडी ता.कणकवली) असे मृताचे नाव आहे. याबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना आज, बुधवारी पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.याबाबत माहिती अशी की, मृत नितीन चव्हाण याला शिकारीचा छंद होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तो राजापूर तालुक्यातील पन्हाळे - शेजवली या गावाकडील जंगल भागात दुचाकीने शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या नादात बंदुकीचा चाप अचानक घाई गडबडीत चुकीचा ओढला गेल्यामुळे किंवा गाडीवरून पडल्यामुळे शर्टमध्ये छातीवर ठेवलेल्या बंदुकीचा चाप दाबला गेल्यामुळे गोळी लागून यामध्ये तो गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेमध्येच त्याने मोठा भाऊ बाळू चव्हाण याला फोन करून आपल्याला गोळी लागल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक जंगलाच्या दिशेने जात त्याला शोधून काढले. उपचारासाठी कणकवली येथे नेत असतानाच नितीनचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबत घटनेचा अधिक तपास खारेपाटण व कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहेत. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.अनेक प्रश्न अनुत्तरीतनितीनच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्याच्यासोबत शिकारीला कोणी गेले होते का? तसेच त्याला गोळी चुकून लागली की स्वतःहून मारून घेतली? किंवा अन्य कुणाकडून त्याचा घातपात करण्यात आला? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. नितीनच्या मृत्यूची बातमी खारेपाटणमध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, एक भाऊ असा परिवार आहे.
Sindhudurg News: शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचीच झाली शिकार, छातीत गोळी लागून मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 21, 2023 11:51 AM