कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे, तर कुडाळ येथील महामार्गावर काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती, तर वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. पावसामुळे खारेपाटण शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच चक्रीवादळाचा फटका कुडाळ तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला. नांदगाव मधलीवाडी येथील दत्तमंदिर स्टॉपलगत रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला आलेल्या भरती व पुराच्या पाण्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलापासून जवळच हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडली, त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर) सिंधुदुर्गात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दोडामार्गमध्ये ६० मि.मी., सावंतवाडी ९५ मि.मी., कुडाळ ७५ मि.मी., वेंगुर्ले ८६.४० मि.मी., मालवण ५४ मि.मी., देवगड ३१ मि.मी., वैभववाडी ७९ मि.मी., तर कणकवली तालुक्यात ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. कणकवली तालुक्यात रविवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला होता. वेंगुर्ले, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, पावसामुळे खूप मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत आपत्कालीन कक्षात झालेली नव्हती. मालवण बंदरात धोक्याचा तीन नंबरचा बावटा ४मालवणात दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जोर पकडला आहे. समुद्रही चांगलाच खवळलेला आहे. शनिवारी बंदर विभागाने पुन्हा एकदा धोक्याचा तीन नंबर बावटा बंदरात लावला आहे. ४गेल्या १५ दिवसांत बंदरात धोक्याचा तीन नंबर बावटा तीन वेळा लावण्यात आला. मच्छिमारांनी मासेमारीस जाऊ नये, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे बंदर विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.
कुडाळात चक्रीवादळ
By admin | Published: July 10, 2016 11:58 PM