सावंतवाडी - शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्यानेच आम्ही बंड केले. यामागे मोठे कारण आहे पण आता महाराष्ट्रात जे नवीन सरकार स्थापन झाले ते कोकणचा विकास करून दाखवेल असा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच शनिवारी सावंतवाडीतील गांधी चौक येथे त्याचा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप याच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खेमसावंत भोसले, सत्कार समिती अध्यक्ष सुभाष पणदूरकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दिलीप नार्वेकर, विकास सावंत, जगदीश मांजरेकर, राजन पोकळ, गणेशप्रसाद गवस अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, अशोक दळवी, बबन राणे, किर्ती बोद्रे, शर्वरी धारगळकर, पंढरी राऊळ, अन्नपूर्णा कोरगावकर, राजन नाईक, निता कविटकर, प्रेमानंद देसाई बाबू कुडतरकर उपस्थित होते.
केसरकर म्हणाले,आमच्या घरात राजकारणात कोणी नाही तरी ही मी राजकारणात आलो पण कधीही बंडखोरी केली नाही. असे सांगत आपला राजकीय इतिहास मांडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाचा गौरव केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही बाळासाहेबा एवढेच प्रेमळ आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला मंत्री केले नाही म्हणून मी शिवसेना सोडली असे कोणी म्हणू नका. एवढे मोठे बंड होण्यामागे काहीतरी कारण असते, मला मंत्री होण्याचा मोह नाही पण राहिलेला विकास आपणास करायचा आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य यापुढे कोकण विकासात अग्रेसर राहील असेही केसरकर यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्शवाद मिळाला. आजही आम्ही सिंधुदुर्ग जिल्हयावर अवलंबून आहोत. गोव्यापेक्षा सुंदर समुद्र किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. गोव्यात जन्म झाला असला तरी माझे सिंधुदुर्गशी नाते आहे. मोपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार आहे. त्यामुळे पर्यटन विभाग तुम्हाला मिळाला तर जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास खलप यांनी केसरकर यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी खेमसावंत भोसले, विकास सावंत आदिचे भाषण झाले यावेळी त्यांनी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या.तर प्रस्ताविक नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष सुभाष पणदूरकर यांनी केले.तर उपस्थितांचे स्वागत माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी केले.
35 वर्षानंतर प्रथमच सावंतवाडीला मान
तब्बल 35 वर्षानंतर सावंतवाडीला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले यापूर्वी कै. भाईसाहेब सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी त्याचा नागरी सत्कार करण्यात आला होता.तसाच यावेळी आपल्या सर्वाच्या साक्षीने नागरी सत्कार करत असल्याचे दिलीप नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्हाप्रशासनाच्या वतीने सावंतवाडीत स्वागत
नव्याने कॅबिनेट मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले दिपक केसरकर यांचे स्वागत सिंधुदुर्ग च्या जिल्हाधिकारी के .मंजूलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकार प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सावंतवाडीत केले.