कणकवली : कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात स्थलांतरीत करण्यात आला. या बेकायदेशीर कृत्यात नगरपंचायत प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल कार्यालयाचे अधिकारी , लोकप्रतिनिधी या साऱ्यांचा हात आहे. या घटनेची माहितीच्या अधिकारामध्ये माहिती आम्ही मागविली असून त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आता जी लढत होईल, ती कायदेशीर होईल आणि यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना याची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला आहे. तसेच हे रयतेचे नव्हे तर लुटारूंचे राज्य आहे. आधी यांचा खासगी मालमत्तेवर डोळा होता. परंतु आता सरकारी मालमात्तेवरही हे डोळा ठेवून आहेत, असेही पारकर यावेळी म्हणाले.
कणकवली विजय भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवा सेना पदाधिकारी राजू राठोड, राजू राणे, दामू सावंत आदी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जिल्हा परिषदेच्या शासकीय जागेत व्हावे, अशी शिवसेनेची पहिल्यापासून मागणी होती. त्याठिकाणी शिल्लक असणाऱ्या १८ गुंठे जागेवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, असे आमचे म्हणणे होते. मात्र, पुतळा रातोरात हलविणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे. हे बेकायदेशीर कृत्य करण्याची मान्यता त्यांना कुणी दिली? त्यांच्यात हिंमत होती तर पुतळा दिवसाढवळ्या का नाही हलविला ? याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ‘आम्हाला काही माहीत नाही’ असे उत्तर दिले. पण, जबाबदार अधिकाऱ्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल.
शासकीय जागेत शिवरायांचे अधिकृत स्मारक होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांतर्फे रात्रीस खेळ चाले सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नवा पुतळा रात्रीच्या सुमारास बसविला गेला तर पूर्वीपासून तिथे असलेला पुतळा हलविण्याची कारवाईही रात्रीच केली गेली. यापूर्वी कणकवली शहरात इमारत पाडण्याचे प्रकार नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून घडले. आता सार्वजनिक ‘प्रॉपर्टी’बाबतही तसेच घडत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध !
नवा पुतळा बसविला गेला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या संगनमताने पुतळा बसवला गेला. तेथे कणकवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी विरोध केला .मात्र, त्यांना बदली करण्याची धमकी दिली गेली. तो पुतळा हलविण्यासाठी लागलेला खर्च, मनुष्यबळ व हे कृत्य करण्यामागचे कारण काय, याची माहिती आम्ही माहिती अधिकारात मागविली असून पुतळा हलविल्याबाबत उच्च न्यायालयातही जाणार आहे. असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.