अनंत जाधव "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या गुरु समान आहेत. त्यामुळे काही झाले तरी त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यामुळे तसा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी कधीही त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास कधीही तयार आहे. त्यात मला कमीपणा वाटणार नाही," असे म्हणत दीपक केसरकर यांनी पवार यांची दिलगिरी व्यक्त केली. तर यापुढे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पण बोलणार नसल्याचे केसरकर यांनी जाहीर केले. ते शुक्रवारी रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडीत बोलत होते. याच वेळी त्यांनी आता माघार नाही म्हणत उद्धव ठाकरे यांना दिलेला अल्टीमेटम संपला असल्याचे सांगितले.
"शरद पवार यांच्यावर मी जे बोललो ती राजकीय वस्तुस्थिती होती. मात्र कोणत्याही पद्धतीने मी त्यांच्यावर टीका केली नाही, असे असताना काहींनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागण्यास तयार आहे," असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
युतीचा धर्म पाळून उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे यासाठी प्रयत्न सुरू होते. वारंवार आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. परंतु आता वेळ संपत आली आहे. आता मातोश्रीवर परत जाणे शक्य नसल्याचे म्हणत दिलेला अल्टीमेटम संपल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच भाजप नेते नारायण राणे यांच्यावर मी कधीही व्यक्तिगत बोललो नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे टाळावे, असे आमचे म्हणणे होते. तर दुसरीकडे त्यांची मुले माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे मी त्यांना लहान म्हटले होते. परंतु तसे म्हणण्याचा त्यांना राग येत असेल तर यापुढे मी कुणावरही बोलणार नाही. जे कोणी माझ्या जिल्ह्यातील स्थानिक नेते टीका करत आहेत त्यांना मी उत्तर देणार नाही, असेही दिपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.