मुंबई - कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर आव्हान आहे असे वाटत नाही. त्यामुळे येथून नितेश राणे 60 ते 70 हजार मतांनी विजयी होतील, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या काळात भाजपाला कोकणात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे हे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते, असेही त्यांनी सांगितले. माजी खासदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, कणकवली मतदारसंघातून नितेश राणे 60 ते 70 हजार मतांनी विजयी होतील. आम्ही गेल्या काही काळापासून वावरत आहोत. त्यामुळे भाजपाने आमचा पक्षप्रवेश लांबवला असे आम्हाला वाटत नाही. नारायण राणे हे भाजपाकडूनच खासदार झाले आहेत. तसे नितेश राणे यांनाही भाजपानेच उमेदवारी दिली आहे.''दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना देऊ केलेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली असता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना आधी निवडणून तर येऊ दे असा टोला लगावला. तसेच आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा आणि युतीला मिळून 200 जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ''सध्या कोकणामध्ये भाजपाचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. मात्र पक्षाला राज्यात जिथे जिथे गरज पडेल, तिथे आम्ही पक्षाला मदत करू, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 1:37 PM