महेश चव्हाण-ओटवणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषिक्रांतीत अग्रेसर असणाऱ्या विलवडे गावाचा (ता. सावंतवाडी) कृषी इतिहास प्रख्यात आहे. अशा या कृषिसंपन्न गावातील प्रमोद राघोबा दळवी या तरुणाने शेतीचा नवा आलेख याठिकाणी उंचावला आहे. आपल्या तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमध्ये केळीच्या तीन हजार रोपांची लागवड करून बेरोजगार तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषिसंपन्न विलवडे गावात भाजीपाल्याचे मळे हे येथील शेतकऱ्यांचे पारंपरिक आर्थिकतेचे साधन. वडिलोपार्जित मिळालेला हा मार्ग पत्करून स्थानिक शेतकरी आजही कुटुंबाची गुजराण करतात. शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला बांदा-सावंतवाडी या बाजारपेठेत विकून दैनंदिन रोजीरोटीचा मार्ग सुकर होतो. पण ज्या पध्दतीने या शेतीपिकाचे आर्थिकदृष्ट्या व्यवसायात रुपांतर व्हायला हवे, त्या पध्दतीने होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून बी. एस्सी. अॅग्रीकल्चरल (उद्यानविद्या) पदवीप्राप्त प्रमोद राघोबा दळवी यांनी केवळ रोजीरोटीपुरती शेती न करता शेतीचे व्यावसायिकीकरण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या भागामध्ये वातावरण उष्ण-दमट असल्याने या समन्वय स्थितीत केळीचे उत्पादन करण्याचा प्रयोग त्यांनी हाती घेतला. गोवा राज्यात त्याला मागणीही मोठी असल्याने त्यांना ही शेती फायदेशीर ठरत आहे. यासाठी त्यांनी ‘सावरबोणी’ या केळीच्या भाजीची निवड केली. प्रथम त्यांनी २००३ मध्ये अर्धा एकर जमिनीमध्ये या सावरबोणी केळीची प्रायोगिकतत्त्वावर लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आणि या भाजीच्या केळीला मागणीही भरपूर असल्याने अंतरा-अंतराने या केळीच्या लागवडीत वाढ करत यावर्षी त्यांनी तब्बल तीन हजार केळींची लागवड केली आहे. हे पीक आता उत्पन्नाच्या वाटेवर आले असून, येत्या काही दिवसांत त्याची तोडणी दिवसात केली जाणार आहे. या भाजी केळी उत्पादनासाठी जवळजवळ मालकीचे आणि भाडेतत्त्वातून सुमारे चार एकर क्षेत्र त्यांनी लागवडीखाली आणले आहे. प्रथम प्रायोगिकतत्त्वावर शेती करताना त्यांनी इन्सुली येथील शेतकऱ्यांकडून १०० बी विकत घेतले. त्यानंतर याच शेतीतून स्वत: बी काढून त्यावर कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करून लागवड करू लागले. आज जी तीन हजार रोपटी उभी आहेत, ती त्यांनीच काढलेली बियाणी आहेत. एकदा बी पाळे-मुळे काढल्यानंतर स्वच्छ करून जवळजवळ १४ ते १५ दिवसांनी त्याला अंकुर फुटतो. बी पुरल्यानंतर जमीन थोडी ओली राहील, हे दैनंदिन पाहावे लागते. विशेषकरून उन्हाळ्याच्या हंगामात लागवड केली. यावेळी जास्त पाणीसाठा वापरला तर केळीचे उत्पादन चांगले येऊ शकते, असे प्रमोद दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विलवडे कृषिसंपन्न गावातील आदर्श तरूण शेतकरी
By admin | Published: August 30, 2015 10:53 PM