सावंतवाडी : भावी पिढीला वन्यजिवांबद्दल माहिती होणे काळाची गरज असून, विविध स्पर्धेच्या माध्यमातूनही माहिती शासन करून देत असते. या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते.महाराष्ट्रात १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तो सिंधुदुर्गमध्येही साजरा करण्यात आला. त्याचा समारोप शुक्रवारी सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलमध्ये करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचे वन्यजीवरक्षक पी. एन. दप्तार, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक व्ही. एन. कदम, प्राचार्य के. टी. परब, वनपाल अमित कटगे, आदी उपस्थित होते.यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. त्यांचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे; पण ही रक्षणाची जबाबदारी भावी पिढीलाही समजावी, म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातून मुलांना प्राण्यांची ओळख होत असते, असे यावेळी त्यांनी सांगितले.तर वन्यजीवरक्षक पी. एन. दत्पार म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीव हा महत्त्वाचा घटक आहे. तो सर्वांनी मिळून जपला पाहिजे. तरच आपला नैसर्गिक अधिवास कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून प्राण्यांची ओळख निर्माण होते, असे सांगत भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल वाढले पाहिजे, यासाठीही प्रत्येकाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.यावेळी विविध स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात प्रवीण राऊत, हर्षदा सावंत, ऋतुजा मोर्ये, दशमी राणे, प्रिया सावंत, आदींचा समावेश आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल व्ही. एन. कदम यांनीही आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)
स्पर्धेच्या माध्यमातून वन्यजिवांची ओळख व्हावी
By admin | Published: October 07, 2016 9:48 PM