कसई दोडामार्ग : शेतीप्रधान भारतात शेती प्राण आहे. त्याला दुय्यम लेखून चालणार नाही. शेतीला अव्वल स्थान दिले पाहिजे. देशाच्या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटसारखे अर्थसंकल्प मांडले जातात, त्याचप्रमाणे शेतीप्रधान देशात कृषी अर्थसंकल्प मांडला, तर देशाची कृषीक्षेत्रामार्फत उल्लेखनीय प्रगती होईल, असे प्रतिपादन गोवा वन व पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सरगवे येथील रामघाट फार्मर संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी केले.यावेळी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, प्रकाश गवस, प्रगतिशील शेतकरी बाबल नाईक, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम पंडित, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक बेडगे, रामघाट संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब राणे, संचालक यशवंत आठलेकर, विठ्ठल दळवी, जयवंत आठलेकर, शैलेश दळवी, संजय सावंत, देवेंद्र शेटकर, नीलेश साळगावकर, वैभव पांगम, रमेश बांदेकर, आदी उपस्थित होते.सरगवे सभामंडप येथे रामघाट फार्मर संस्थेचे उद्घाटन गोवा वन व पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मंत्री आर्लेकर म्हणाले, आपल्या देशात, राज्यात अनेक कंपन्या, संस्था स्थापन झाल्या. पैसा कमविणे हा त्यांचा उद्देश असतो; पण रामघाट फार्मर संस्थेचा तसा उद्देश नाही. शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. छोट्या, मध्यम शेतकऱ्यांच्या मर्यादित जमिनी, मर्यादित साधने, तंत्रज्ञानाचा अभाव, बाजारपेठेतील स्पर्धा, बाजारभाव, अस्थिरता, योग्य बाजारपेठ याचे सर्व मार्गदर्शन रामघाट संस्था प्रत्येक शेतकऱ्याला देणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्याचे काम संस्था करणार आहे. जैविक शेती ही आपली परंपरागत संस्कृती असून त्याची जपणूक केली पाहिजे, असेही आर्लेकर यांनी सांगितले. यावेळी अतुल काळसेकर, प्रकाश गवस यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब राणे यांनी प्रास्ताविक, विठ्ठल दळवी यांनी सूत्रसंचालन, तर यशवंत आठलेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कृषी अर्थसंकल्प मांडल्यास देशाची उन्नती
By admin | Published: April 06, 2016 10:02 PM