महेश सरनाईकसिंधुदुर्ग : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर भाजपकडून आता बदलासाठीच्या राज्यात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून आपल्यासमवेत ३० ते ३५ आमदारांना घेऊन भाजपाप्रणित गुजरात राज्यात आसरा घेतला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला असून शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांमध्ये कोकणातील काही आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार नीतेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताबदल झाल्यास नीतेश राणे है सिंधुदुर्गचे पालकमंत्री होण्याची शक्यता राजकीय धुरिणांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तीन आमदार आहेत. यात कणकवली देवगड, वैभववाडी या मतदार संघातून भाजपाचे आमदार नीतेश राणे तर उर्वरित म्हणजे कुडाळ, मालवणसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या मतदार संघासाठी सेनेचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. त्यामुळे सद्य राजकीय परिस्थितीचा विचार करता तीनपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. तर एक भाजपचा.जिल्ह्यात सेनेचे दोन आमदार असतानाही या दोघांनाही बाजूला करत ठाकरे सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीदेखील करण्यात आले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या राजकीय नाट्यावरून शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूरदेखील होता. मात्र, त्याला वाचा फोडण्यासाठी कोण पुढे येत नव्हते.वैभव नाईक जायंट किलर ठरूनही दुर्लक्ष
- शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी २०१४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण मतदार संघामद्ये सर्वप्रथम पराभव करत याठिकाणी भगवा फडकविला होता.
- त्यामुळे वैभव नाईक यांच्याकडे जायंट किलर म्हणून पाहिले जात होते. त्यातच २०१९ च्या निवडणुकीत वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. असे असतानाही पक्षनेतृत्वाने नाईक यांना मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच केल्यासारखे होते.
- मात्र, नाईक हे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असल्याने त्यांनी बंडाचे निशाण रोवले नाही.
जिल्हा बँकेत एकहाती सत्ता मिळविलीनारायण राणे यांच्या ३ नेतृत्वाखाली भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला गेल्या तीन वर्षांत चांगले यश मिळवून दिले आहे. त्यात वेगवेगळ्या निवडणुकांसह राज्यात गाजलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळविली. त्या निवडणुकीत नीतेश राणेंनी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राज्यातील भाजपामध्ये नीतेश राणेंनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे.दीपक केसरकर नाराज, शिंदेंच्या संपर्कात ?
सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे युती शासनाच्या काळात म्हणजे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी पाच वर्षे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केले होते. २०१९ च्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून दुसऱ्यांदा आमदार झाले. मात्र, ज्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी केसरकर यांना डावलण्यात आले. त्यामुळे केसरकर काही काळ नाराजदेखील होते.
आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजप ठरणार अव्वल
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत ४ समिती, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी होण्याची शक्यता आहे. कारण भाजप सत्तेत आल्यास त्याचा फायदा सिंधुदुर्ग भाजपाला होणार आहे. त्यामुळे भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे घट्ट करण्याची यातून मोठी संधी निर्माण होणार आहे.
नीतेश राणेंना मिळणार संधीभाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत नीतेश राणे यांनी आमदार म्हणून चांगले काम केले आहे. नीतेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणूनदेखील काम करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक रणनितीमध्येही नीतेश राणे यांना संधी देण्यात आली होती.