सावंतवाडी : माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेसाठी जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे. तरी पण जर ही योजना पुन्हा सुरू न केल्यास जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरू असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जनतेच्या कल्याणासाठी शिवसैनिकांनी कोणाचाही मुलाजमा न ठेवता रस्त्यावर उतरायला पाहिजे ही शिकवण आम्हाला हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे जनहितासाठी चांदा ते बांदा योजना सुरु होण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करू आणि योजना सुरू करू असे सांगितले.यावेळी पडते म्हणाले, यापुढील काळात भाजपची परिस्थिती काँग्रेससारखी होणार असून अनेक नारायण राणे समर्थक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य शिवसेनेकडे येण्यास इच्छुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दीपक केसरकर यांनी भाजपमध्ये यावे त्यांना आपण निवडून देऊ या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.भाजपच्या प्रदेश नेत्यांनी प्रमोद जठार यांना डावलून पाच वर्षांपूर्वी आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्रवेश केलेल्या राजन तेली यांना विधान परिषद निवडणुकीत संधी दिली यावरुन प्रमोद जठार यांनी पक्षात आपली पत काय आहे हे ओळखावे. जो स्वत:साठी उमेदवारी मिळवू शकत नाही तो दीपक केसरकर यांना तिकीट कसे काय देऊ शकतो, केसरकर नाराज आहे असे कोणीही अजिबात समजू नये. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक हे पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यात होते.
प्रमोद जठार हे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले असून यापुढे त्यांना देवगड कणकवली मतदारसंघातील तिकीट मिळणार नसल्याने ते केसरकर यांच्यावर टीका करीत आहेत.चांदा ते बांदा योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये निधी असून ही योजना बंद होणार असा गैरसमज प्रमोद जठार यांनी करून घेऊ नये. शिवसेनेला या जिल्ह्याने प्रेम दिले आहे म्हणून दीपक केसरकर शिवसेनेकडून आमदार झाल्यावर पहिल्यांदा त्यांना मंत्रीपद देण्यात आले.प्रमोद जठार यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व शरद पवार यांच्या भेटीवरही वक्तव्य केले. त्याला उत्तर देताना संजय पडते म्हणाले, शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत व सहकार क्षेत्रातील ते जाणकार आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महा विकास आघाडीला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार असून सिंधुदुर्ग बँक महा विकास आघाडीकडे राहणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दिला. यावेळी निष्ठावंत शिवसैनिक बाळा पावसकर उपस्थित होते.