कुडाळ : सेवाजेष्ठता व पुरेशी मानधन वाढ मिळेपर्यंत अंगणवाडी सेविका कर्मचारी संप मागे घेणार नसुन हा संप मागे घेण्यात यावा या करीता शासन ज्या पध्दतीने दडपशाही करीत आहे त्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो अशी माहीती प्रसिध्दी पत्रकातुन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परूळेकर यांनी देत मागण्या मान्य न झाल्यास दि. ५ अॉक्टोबर रोजी राज्यात जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रसिध्दी पत्रकातुन कमलताई परूळेकर म्हणाल्या की, संपुर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी सेवाजेष्ठता व पुरेशी मानधन वाढ मिळेपर्यंत संप सुरू केला आहे. या संपाला सत्तेतील शिवसेनेने तसेच सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पांठिबा दिला आहे. असे असताना हा संप फोडण्यासाठी सरकारने नेमलेले पगारी नोकर खोटे नाटे सांगत सेवासमाप्तीच्या नोटीसा राज्यातील विविध प्रकल्पात देत फिरत असुन कोणीही या त्यांच्या प्रयत्नानां भीक घालु नका पाठविलेल्या सर्व नोटीसांची होळी करायची आहे. असे आवाहन परूळेकर यांनी अंगणवाडी सेविकांना केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्गात अंगणवाड्या सुरू असल्याचा खोटा मॅसेज प्रकल्प अधिकार्यांना पाठवुन अंगणवाडी कर्मचार्यांची बदनामी केली तसेच पाठविलेल्या नोटीशीमध्ये गैरवर्तन हा शब्द वापरणे हे चुकीचे केले असुन त्यांनी कटुता निर्माण करू नये असा सल्ला परूळेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला.
अंगणवाडी कर्मचार्यांना पाठविलेल्या नोटीसांची लवकरच होळी करण्यात येणार असुन मागण्या मान्य न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी दि. ५ अॉक्टोबरला ओरोस येथे जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा परूळेकर यांनी सरकारला दिला.
प्रशासनाने कितीही नोटीसा दिल्या तरीही कोणीही संपाला गालबोट लावु नका कारण आपला एकोपाच शासनाला धडा शिकविणार आहे असे ही परूळेकर यांनी सांगितले.