सावंतवाडी : आघाडीसोबत लढलो म्हणून माझा पराभव झाला, एकटा लढलो असतो तर नक्कीच विजय झाला असता, मात्र आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार, तेव्हा माझा विजय नक्की आहे, अशी खंत वजा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. ते सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुकही केले. तसेच त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती शाब्बासकीतून दिली.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, इफ्तिकार राजगुरू, नारायण सावंत, रवी जाधव, बांधकाम व्यवसायिक बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. राजू शेट्टी यांनी साळगावकर यांच्या पाटील कॉप्लेक्समधील गुरुकुल येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यात वेगवेगळ्या राजकीय विषयांवर रंगतदार चर्चा झाली. यावेळी राजू शेट्टी यांनी आपला झालेल्या पराभवाची समीक्षा करनाता आघाडीसोबत गेल्यानेच हा पराभव झाल्याची खंत बोलून दाखविली.
राजू शेट्टी यांनी बबन साळगावकर यांचे कौतुक केले. तुम्ही आजपर्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुढची लढाई तुम्हाला जिंकायची आहे, असा सल्लाही दिला. मागच्या वेळी आघाडीसोबत लढलो, त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. एकटा लढलो असतो तर निश्चितच जिंकलो असतो. मात्र तिसऱ्यांदा निवडून येईन,असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी साळगावकर यांनी आपण नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केले. परंतु दरम्यानच्या काळात विधानसभा लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी यश आले नाही, असे सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, काही झाले तरी तुम्हाला पुन्हा लढावे लागेल. आपल्याला मानणाऱ्या लोकांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी सुद्धा तिसऱ्यांदा निवडून येणार आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.असेही ते म्हणाले. यावेळी शेट्टी यांनी उपस्थितांसमोर आपला राजकीय प्रवास मांडताना सध्याच्या महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावरही भाष्य केले. मात्र आपली भविष्यातील भूमिका ही एक 'एकला चलो रे'ची असेल असे संकेत सुद्धा त्यांनी यावेळी दिले.