सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेली काही वर्षे उद्भवणाºया माकडतापावर मात करण्यासाठी बांदा तसेच दोडामार्ग तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांमधे माकडताप प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांचा याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो त्यांनी द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.
यापुढे जिल्ह्यात कुठेही माकड मृत आढळले तर त्याबाबत तत्काळ १०७७ या क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती द्यावी, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली. तसेच यापुढे ग्रामपंचायत परिसरात माकडाचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहील, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
यावेळी शेखर सिंह पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा याठिकाणी माकडताप या आजाराने थैमान घातले आहे. या माकडतापावर मात करण्यासाठी दोडामार्ग परिसरातील तीन आणि बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांतील नागरिकांना माकडताप प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. या लसीकरणासाठीचे बरेच टप्पे आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व जनतेने ही लस घेणे आवश्यक आहे.
मात्र या गावांमधून आवश्यक तो प्रतिसाद जनतेकडून मिळत नाही. आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्केच लोकांनी ही लस घेतली आहे. ही लस माकडताप निवारणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही लस सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शेखर सिंह यांनी यावेळी केले.
आता जबाबदारी ग्रामपंचायतींची माकडताप या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापुढे मृत माकड ग्रामपंचायत क्षेत्रात मिळाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला ५०० रुपये प्रति माकड मानधन देण्यात येणार आहे. तसेच मृत माकडासंदर्भातील माहिती देणाºयास ५० रुपये देण्यात येणार आहेत. असे सांगतानाच जिल्ह्यात कुठेही मृत माकड सापडल्यास त्या संदर्भातील माहिती १०७७ या क्रमांकावर तत्काळ दूरध्वनीद्वारे द्यावी असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा विशेषत: दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांमधे प्रादुर्भाव आहे. मात्र त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात नाही. तरीही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यात टॅमी फ्ल्यू या गोळ्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.