सावंतवाडी : पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? असा सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
किरण सामंत लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा प्रचार करून निवडून आणू, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले, माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने मुंबई शहराला आठवड्यातून तीन दिवस वेळ देणार आहे.
उमेदवार भाजपचाच - राणेरत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे. हा मतदारसंघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, असे केंद्रीय उद्योगमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघावर शिंदे गटाची शिवसेना दावा करत असून राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेची उमेदवारी मागत आहेत. याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, या मतदारसंघात भाजपच उमेदवार देणार आहे. तुम्ही लोकसभेला उभे राहणार का ? यावर उत्तर देताना राणे म्हणाले. हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल. पक्ष जो उमेदवार देईल, तो आम्ही सर्व जण निवडून आणू.
राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबआगामी निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिवसेना (उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.