कणकवली: ज्यांच्या ताटात खायचे त्यांच्याच तोंडाला पाने पुसायची अशी दीपक केसरकर यांची पध्द्त आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांना तसेच नवनियुक्त सरपंचाना प्रशासन, अधिकारी यांच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास मंत्री उदय सामंत यांचाही रस्ते तसेच अन्य बाबीतील भ्रष्टाचार आम्ही कधीही बाहेर काढू शकतो. हे त्यांनी लक्षात घ्यावे. केसरकर व सामंत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून यावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले. राज्यातील सध्याचे सरकार हे औटघटकेचे आहे. कारण येत्या दोन ते तीन महिन्यात भाजपच स्वतःहून हे सरकार पाडणार आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला. कणकवली तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, संदीप कदम, वैदेही गुडेकर, राजू शेट्ये, सचिन सावंत, कन्हैया पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने चांगले यश मिळवून कोकणातून पुन्हा एकदा विजयाचा झंझावात सुरू केला आहे. आगामी सर्व निवडणुकीत तो ' बांदा ते चांदा' पर्यंत निश्चितच पोहचेल. त्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागावे. ग्रामपंचायत निवडणुकित आपल्या विरोधात कौरव सेना सर्व तयारी निशी उभी राहिलेली असताना सुद्धा कणकवली विधानसभा मतदार संघात आपल्या शिवसेनेला ६८,१३० मते मिळाली आहेत. ही गरुडझेप असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघात आपला भगवा फडकेल.वैभव नाईक म्हणाले, आता राज्यात शिवसेनेची सत्ता नसली तरी , नवनर्वाचित सरपंचांना प्रशासकीय तसेच इतर सहकार्य निश्चितच करू. लोकांनी ठरविले की ते निश्चितच भूमिका घेतात.हे या निवडणुकीत दिसून आले आहे. नवीन सरपंचांना विरोधकांकडून आश्वासने दिली जातील. पण तुम्ही शिवसेनेमुळे निवडून आला आहात. भाजप विरोधी जनतेने दिलेला तो कौल आहे. त्यामुळे शिवसेनेशी प्रामाणिक राहायला पाहिजे. सध्या राज्यात व देशात सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे नवनर्वाचित सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सतर्क रहावे. यावेळी अरुण दुधवडकर, सतीश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे,संजय पडते यांनीही मनोगत व्यक्त केले.नारायण राणेंची नार्को टेस्ट करा!शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्याचे काम नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र करीत आहेत. दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ते करीत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात आतापर्यंत झालेल्या नऊ राजकीय हत्यांची चौकशी एसआयटीतर्फे करण्यात यावी अशी आमची मागणी असून याप्रकरणी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचीही नार्को टेस्ट करावी म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल. असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.
शिवसैनिकांना त्रास दिल्यास मंत्री उदय सामंतांचेही भ्रष्टाचार बाहेर काढू, विनायक राऊतांचा इशारा
By सुधीर राणे | Published: January 02, 2023 5:53 PM