मनोज वारंगओरोस : कोकण रेल्वे प्रवाशांच्या न्याय मागण्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाकडून गेले वर्षभर मागण्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती आहे.याबाबत प्रवासी जनतेचा कौल घेण्यासाठी या समितीमार्फत गाव भेट दौरे आयोजित करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला.सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक रविवारी अध्यक्ष शुभम परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव प्रकाश पावसकर, कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर, समन्वय समितीचे निमंत्रक सल्लागार ॲड. नंदन वेंगुर्लेकर, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात सहा प्रवासी समित्या कार्यरत असून, या प्रवासी समित्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रश्नांबाबत सातत्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमार्फत रेल्वे प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले. कोकण रेल्वेच्या नावाखाली अन्य राज्यांना त्याचा फायदा होतो. याबाबत सिंधुदुर्गातील प्रवासी समित्यांच्या माध्यमातून प्रखर लढा उभारणे गरजेचे आहे. सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता असून, केंद्रातील मंत्री आणि खासदार यांचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु, अजूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही.गावभेट दौऱ्याचे आयोजन
या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना याची जाणीव करून देण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर प्रत्येक रेल्वे प्रवासी समित्यांच्या माध्यमातून पंचक्रोशी गावभेट दौरा आयोजित करणार आहोत. तसेच त्या त्या गावातून रेल्वेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही तर मतदान नाही याबाबत जनमत कौल घेऊन त्या दृष्टीने निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.