कणकवली: नांदगाव येथील प्रचारसभेत मी योग्य तेच बोललो आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? गावात निधी कसा येणार ? याचे उत्तर आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी द्यावे. तसेच त्याची चर्चा माझ्याबरोबर त्यांनी जाहीर व्यासपीठावर करावी. असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी आज दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कणकवली नगरपंचायतीला निधी दिला नाही. जिल्हा नियोजन समितीत मी सुचविलेली कामे डावलली त्यावेळी नाईक, उपरकर गप्प का राहिले? असाही सवाल त्यांनी केला. कणकवली येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले, कणकवली मतदार संघातील जनतेशी माझे अतुट नाते आहे. त्यामुळे मला अधिकारवाणीने बोलायचा हक्क आहे. मतदारसंघातील लोकही काही चुकीचे घडल्यास माझ्याशी बोलत असतात. आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांना जर मतदान केले नाही. तर संबधित गावाचा विकास कसा होणार? याचे विश्लेषण माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी करावे. ग्रामपंचायतीत ज्याचे पॅनल, उमेदवार निवडून येतील त्यांनी गावाचे प्रश्न रस्ते, पाणी, वीज प्रश्न सोडवावा. राज्य सरकार, केंद्र सरकारकडून निधी आणावा. अशी भावना मतदारांची असते, म्हणून ते पॅनेल निवडून देतात. त्यांनी जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून दिला. तर निधी कसा येणार? माझ्या आणि मतदारसंघाच्या नात्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्यामुळे कुणाला प्रसिद्धी मिळत असेल किंवा कुणाला आपल्या मालकांकडून वाहवा मिळत असेल तर त्यात मी समाधानी आहे. खासदार विनायक राऊत हे केंद्र शासनाच्या विरोधी गटात आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे राज्यात विरोधी पक्षात आहेत. गेल्या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. ग्रामपंचायतींना ज्या मंत्रालयामार्फत निधी येतो. त्या खात्याचे मंत्री भाजपचे आहेत. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत.
भाजपचा मी एकमेव आमदार
पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत भाजप पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे नेते माझ्या मतदारसंघावर अन्याय करणार का? मी दिलेली कामांची यादी नाकारणार का? ते राणेंच्या मुलाच्या मतदारसंघाला कधीही डावलणार नाहीत असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
कणकवलीवर महाविकास आघाडीने अन्याय केलाअडीच वर्षाच्या कालावधीत कणकवली मतदारसंघावर महाविकास आघाडीने प्रचंड अन्याय केला. साकवांची एकही यादी स्वीकारली नाही. रस्ते यादी पाठवली त्याला मंजूरी दिली नाही. मी जिल्हा नियोजनमध्ये नेहमी भांडायचो. पण मी पाठवलेल्या कामांच्या याद्या बदलून टाकायचे. त्यावेळी परशुराम उपरकर, वैभव नाईक यांना चुकीचे का वाटले नाही.
बिनविरोध झालेल्या गावांना ५० लाखांचा निधी
जे माझ्याकडे ग्रामपंचायती देतील त्या ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. बिनविरोध झालेल्या गावांना मी ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे. ज्यांच्याकडे विकास करण्याची धमक आहे, त्यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी उभे राहावे असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.