कणकवली: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवावी अशी असेल तर त्यांनी बंधू किरण सामंत यांना भाजपमध्ये पाठवावे. मग आमचे पक्ष श्रेष्ठी विचार करतील आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवता येईल. मग कोणचं दुखावणार नाही. किरण सामंत सध्या कोणत्याच पक्षात नाहीत, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे. मग त्यांचा विचार होईल असेही भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सांगितले.राणे म्हणाले, मंत्री उदय सामंत हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. तसेच ते जबाबदार मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी दावे किंवा आपआपसात टीकाटिप्पणी करू नये. महायुतीच्या बैठका होणार आहेत. ही जागा कोणाला मिळणार हे आज जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही. कारण पक्षाच्या फोरमवर ही चर्चा होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीला हा खासदार देणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोण कुठे लढणार ? याला महत्व नाही.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेची जागा महायुती, एनडीएचीच निवडून आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही भूमिका मांडली आहे. आम्ही काही आकडेवारी मांडली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भूमिका मांडली आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही कळविले आहे. त्यामुळे मला वाटते की मंत्री उदय सामंत यांनी घाई करू नये.
उदय सामंतांची भावाने लोकसभा लढवावी अशी इच्छा असेल तर.., नितेश राणेंनी स्पष्टच सांगितले
By सुधीर राणे | Published: September 26, 2023 5:31 PM