सिंधुदुर्ग: हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, आज सकाळी ७.३० पासून अवकाळी पावसाने पुन्हा तळकोकणात हजेरी लावली होती. जवळपास एक तास पाऊस सुरु होता. मागील आठवडयातही अवकाळी पाऊस झाल्याने बागायतदार वर्ग चिंतेत पडला होता. त्यात पुन्हा अवकाळीचे संकट आल्याने आंबा, काजू पीक धोक्यात गेलं आहे. आंबा पिकाला मोहोर बऱ्यापैकी आला असून काही ठिकाणी फळधारणा सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा तसेच काजू मोहोर काळवडून खराब होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात आणि विशेष करून कोकणातही यावेळी थंडी जोरदार पडल्याने बागायतदार वर्ग आनंदित होता. पण अवकाळी पावसाने या आनंदावर विरजण घातलं आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात काजू आणि आंबा पीक धोक्यात आल्याने यावर्षीही नुकसानच अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आज सकाळी सुरू झालेला पाऊस सिंधुदुर्गच्या सहयाद्री पट्ट्यात पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीच्या काही भागात आज आणि उद्या दिवसभर ढगाळ आणि पावसाचे वातावरण असण्याची शक्यता आहे.