सिंधुदुर्गनगरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांना चाप बसावी यासाठी शासन आदेशान्वये वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालक-मालक, पर्यटकांकडून आकारण्यात येणा-या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणा-या पर्यटकांनी आणि जिल्ह्यातील वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे तसेच वाहन चालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावित अन्यथा संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी एस. बी. मुल्ला यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांवर कारवाईही केली जात आहे.वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर नवीन शासन आदेशानुसार वाढीव दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांनी आपल्या सोबत ड्रायव्हिंग लायसन्स, आर.सी. बुक, विमा प्रमाणपत्र, पी.यू.सी आदी कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि संभाव्य होणा-या दंडात्मक कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन मुल्ला यांनी केले आहे.आगामी काळात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. वाढती वाहन संख्या लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून आणि वाहतूक नियमांचे पालन करून जिल्ह्याची वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक शाखेला सहकार्य करावे, असे आवाहन मुल्ला यांनी केले आहे.दंडाचे अधिकारी वाहतूक शाखेलाआता नवीन शासन आदेशानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक आणि वाहन चालकांकडून सुधारित वाढीव दंड (तडजोड शुक्ल) भरून घेण्याचे अधिकार या वाहतूक शाखेला मिळाले आहेत. या नविन शासन आदेशाची अंमलबजावणीही जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणारे पर्यटक आणि जिल्ह्यातील वाहन चालकांनी मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.अशी असणार दंडाची रक्कम !वाहन चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड भरावा लागणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार अवैध प्रवाशी वाहतूक १ हजार रुपये, ड्रायव्हींग लायसन्स नसणे ५00 रुपये, लायसन्स नसलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास देणे ५00 रुपये, वेग मर्यादेचे उल्लंघन १ हजार रुपये, हेल्मेट नसणे ५00 रूपये , वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे २00 रूपये, अस्पष्ट नंबर प्लेट २00 रुपये, फॅन्सी नंबर प्लेट १ हजार रुपये, काळ्या काचा २00 रुपये, इन्शुरन्स नसणे चालक ३00 व मालकाला २ हजार रूपये, पी.यु.सी. काढलेली नसणे ५00 रुपये आणि मद्यपान करून वाहन चालविणा-याला न्यायालयाच्या आदेशानुसार दंड आकारण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गात येताय, मग वाहतूक नियमांचे पालन करा, पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 7:13 PM