कणकवली : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता ताळतंत्र सोडले आहे. या दोघांसह विरोधकांनी जनतेची दिशाभूल करीत आमच्यावर विनाकारण आरोप करणे न थांबविल्यास या सर्वांच्या कुंडल्या बाहेर काढण्यात येतील, असे सांगतानाच राजन तेली यांचा पुत्र प्रथमेश याच्यावरील हल्ल्याशी नीतेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही. प्रथमेशला आतापर्यंत अनेकवेळा मार पडला आहे. तो फार ‘गुणी’ मुलगा आहे. अशी त्याची संभावनाही काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केली.येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, मंत्री चव्हाण, जठार हे भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर आपले वजन वाढावे यासाठी बिनबुडाची टीका आमच्यावर करीत आहेत. याबाबत त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषेत बोलायचे तर ‘याची उंची किती आणि माणूस बोलतो किती? अशी स्थिती आहे. प्रमोद जठार दलाल असून, मुंबईत दलाली करीत आहेत. असा माणूस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. यावरून भाजपची नीतिमत्ता स्पष्ट होते.आमच्यावर टीका करण्यापूर्वी सिंधुदुर्गात भाजप, शिवसेनेने केलेले एकतरी विकासकाम सांगावे. या जिल्ह्याच्या विकासात शिवसेना, भाजपचा वाटा शून्य आहे. सी-वर्ल्डचे काम बंद आहे. विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे अद्याप भूसंपादन झालेले नाही, रेडी पोर्ट रद्द केले आहे. आडाळी एमआयडीसीचे काम बंद झाले आहे. आतापर्यन्त चालू असलेली विकासकामे या सत्ताधाऱ्यांनी बंद केली आहेत.ज्यांना काँग्रेसने नाकारले त्यांना भाजप प्रवेश देत आहे. पारकर, आचरेकर जिल्हा भ्रष्टाचारमुक्त करू असे सांगतात. मात्र, भ्रष्टाचार करणे हाच यांचा धंदा आहे. दीपक सांडव हा चिटर आहे. त्याला मुख्यमंत्री आपल्या दालनात प्रवेश देतात. हेच खरे आश्चर्य आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण फार बोलू लागले आहेत. आतापर्यंत त्याची दखल घेतली नव्हती. मात्र, आता त्यांची कुंडली आगामी अधिवेशनात बाहेर काढणार आहे. रवींद्र चव्हाण स्वत:च्या चारित्र्यासारख्याच माणसांना भाजपमध्ये नेत आहेत. भाजपमध्ये जाणाऱ्यांची जनमाणसात काय प्रतिमा आहे, हे सर्वांना माहीत आहे.तर पालकमंत्री विकासासाठी निधी आणल्याचा पोकळ बाता मारत आहेत. जिल्हा परिषदकडे ११ कोटी रुपये निधी उपलब्ध असूनही ते खर्च करु शकत नाही. कारण, त्या प्रस्तावावर पालकमंत्र्यांना सही करायला वेळ नाही.राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समिती आघाडीबाबत आमच्याशी अजूनही संपर्क साधलेला नाही. आमची स्वबळावर लढण्याची ताकद आहे, मात्र राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर निश्चितच विचार करण्यात येईल, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.अवैध धंद्यांविरोधात निवडणुकीनंतर आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू, मटका, वेश्या व्यवसाय वाढला आहे. राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण वाढले आहे. सत्ताधाऱ्यांचा याला वरदहस्त आहे. त्यांची जोरदार हप्तेबाजी सुरू आहे. या निवडणुकीनंतर या विरोधात काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.
आरोप न थांबविल्यास कुंडल्या बाहेर काढणार
By admin | Published: January 20, 2017 10:56 PM