दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : केवळ मतदार म्हणून जगू नका. घटनेने दिलेले नागरिकत्वाचे हक्क वापरून स्वतःच्या अस्तित्वासाठी 'इकोसेन्सिटिव्ह'चा लढा द्या. आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल, असा इशारा साखळी (गोवा) येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गांवस यांनी दोडामार्ग येथे दिला.केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका संपूर्ण वगळला आहे. त्याचा समावेश करावा, या मागणीसाठी 'घुंगुरकाठी सिंधुदुर्ग' संस्थेने 'वनश्री फाउंडेशन' आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने सहकार्याने दोडामार्ग बाजारपेठेत जनजागृती आणि स्वाक्षरी मोहिम राबवली. यावेळी गांवस बोलत होते.यावेळी 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत, ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, दीपक गवस, नंदकुमार गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.गोव्यातील लोहखनिज खाणींमुळे झालेल्या पर्यावरण विध्वंसाविरोधात यशस्वी लढा दिलेले गांवस पुढे म्हणाले की, खाणींमुळे होणारे भयानक दुष्परिणाम गोमंतकीय जनता भोगते आहे. खाणींचा फायदा फक्त मुठभर धनिकांना होतो. यात गोव्यातील अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. न्यायालयीन लढ्यामुळे गोव्यातील खाणी बंद झाल्या. यामुळे खाणमालकांची वक्रदृष्टी आता निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि त्यातही दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांकडे वळली आहे.कळणे खाण, सह्याद्रीमध्ये प्रचंड वृक्षतोड करुन होणारी रबरसारखी एकसुरी लागवड यामुळे आधीच या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खाणमालकांना मोकळे रान मिळावे, यासाठी केंद्राने आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका वगळला आहे. हे षडयंत्र वेळीच लक्षात घ्या.केवळ पाच वर्षांनी एकदा मतदान करणारे मतदार एवढ्या भुमिकेत राहू नका. राज्यघटनेने दिलेले अधिकार बजावणारे दक्ष नागरिक व्हा, असे सांगुन गांवस म्हणाले की, दोडामार्ग तालुक्याचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात होण्यासाठी 'घुंगुरकाठी' संस्थेने उचललेले पाऊल महत्वाचे आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या जैवविविधतासंपन्न भागातील निसर्ग, वन्यजीवनच नव्हे तर मानवी जनजीवनही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या चुकीच्या अधिसुचनेविरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवा. उशीर केलात तर तुमचे अस्तित्व संपून जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा समावेश केलेला नाही. यामुळे दोडामार्ग तालुक्यावर लोहखनिजासह अन्य खाणींचे काळेकुट्ट संकट उभे ठाकले आहे. याबाबत अभ्यासक, विषयतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींनी आपली मते, आक्षेप व सूचना पत्राद्वारे, केंद्रीय वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 'वनश्री'चे अध्यक्ष संजय सावंत यांनी दोडामार्ग, तिलारी परिसराचे नैसर्गिक महत्व विशद केले.यावेळी ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, दीपक गवस, समीर शेट्ये यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, नंदकुमार गावडे नंदकिशोर गवस, संदीप घाडी, धीरेंद्र घाडी, संगम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 2:26 PM