सावंतवाडी : कसा का बरा हा ना म्हणत अज्ञाताकडून सावंतवाडीत बॅनरबाजी करत ''आता बदल हवो तर आमदार नवो !'' अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेत. यातील काही बॅनर फाडून काढून टाकले आहेत पण काही सकाळी उशिरापर्यंत होते. शहरात त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत शिंदेसेनेकडून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.सावंतवाडी शहरात अज्ञाताकडून मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपरोधिक 'बॅनर लावण्यात आला आहे. हे निनावी बॅनर लावून केसरकर यांच्यावर तोफ डागण्यात आली असून आता मोती तलावाच्या काठावर चार दिवे लावलात म्हणजे विकास नाही हे यातून सांगितले आहे. दोडामार्ग, वेंगुर्लेनंतर सावंतवाडी शहरात झळकलेले बॅनर 'चाय पे चर्चे'चा मुद्दा ठरले. मालवणी भाषेत या बॅनरवरचा मजकूर असून केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे. ''दीपक भाईनू, आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजा होतो. पण दर येळाक आमच्या भावनांची खेळ केलास मवो. इकास, इकास आणि इकास....पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास. पण भाईनू, ' अशा आशयाचे हे बॅनर आहेत. या बॅनरवर नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ''सीसीटीव्ही बघून कारवाई करा''या बॅनरबाजीनंतर शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा असे निवेदन दिले आहे. मंत्री केसरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असून परिसरातील सीसीटीव्ही बघून या बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या उपस्थितीत अॅड नीता सावंत कविटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बबन राणे, खेमराज कुडतरकर, गजानन नाटेकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, विनायक दळवी आदिनी पोलिसांची भेट घेतली.
आता बदल हवो तर आमदार नवो, सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदे गटाकडून कारवाईची मागणी
By अनंत खं.जाधव | Published: October 02, 2024 3:42 PM