- अनंत जाधव
सावंतवाडी : महाराष्ट्राचे राजभवन तसेच राज्यपाल हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. याचा प्रत्यक्ष अनुभव शनिवारी राज्यपालांच्या सिंधुदुर्ग दौर्यात प्रशासनासह पत्रकार व राजकारण्यांना आला. राज्यपालांच्या मिश्कील स्वभावाने वातावरण चांगलेच हलके फुलके बनले होते. याचे कारण ही पत्रकार बनले.
पत्रकारांनी राज्यपालांना पत्रकार परिषद घेणार का विचारताच त्यांनी "मुलाखात लेना है तो मंत्रीजी के पास जाव, फोटो खिचना है तो मेरे पास आओ'', असे म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली. तसेच सोबत असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही चिमटा काढला. राज्यपालांच्या मिश्कील स्वभावाचे दर्शन सगळ्यांनाच घडले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एक दिवसाच्या सिंधुदुर्ग भेटीवर आले होते. सुरुवातीला तळेरे येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी वेंगुर्लेकडे प्रयाण केले. वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातील विश्रामगृहात भोजन व्यवस्था करण्यात आली होती. तेथे जेवण घेतल्यानंतर काही काळ राज्यपाल निवांत होते. त्यामुळेच त्यांच्या सोबत असणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विनंती करून राज्यपाल पत्रकार परिषद घेणार काय?अशी विचारणा केली.
मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले. पण त्यापुढे जात मुलाखात लेना है, तो मंत्री जी के पास जाओ, असे सांगत मंत्री केसरकर यांच्याकडे बोट दाखवले. तर फोटो खिंचना है तो मेरे पास आओ, असे सांगितले. राज्यपालांच्या या मिश्किल स्वभावामुळे काही काळ मंत्री केसरकारांसह प्रशासनही गडबडले. पण लागलीच केसरकर यांनी राज्यपालांना आपणच मंत्रिमंडळ नेमता त्यामुळे तुम्हालाच सर्वाधिकार आहे, असे स्पष्ट करत आभार ही मानले.
तरीही पत्रकारांनी राज्यपालांना तुम्हाला सिंधुदुर्ग कसा वाटला असे विचारले असता खूप सुंदर, असे म्हणत सिंधुदुर्ग ही चांगला वाटला आणि येथील जेवणही चांगले होते, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा प्रशासनाकडून राज्यपाल यांना कॉफी टेबल बूक देण्यात आले. त्यांची त्यांनी स्तुती करतनाच खूप सुंदर बुक बनवले. असे मराठीतून म्हणत दाद दिली. मंत्री केसरकर यांच्या हस्ते हे कॉफी टेबल बुक राज्यपालांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.