नीलेश मोरजकर-- बांदाबांदा परिसरातील ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या कित्येक वास्तू या देखभाल दुरुस्तीअभावी लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. बांदा-सटमटवाडी येथील मठ पर्वतावर जागृत असलेले शिवकालीन संतश्रेष्ठ श्री रामभट स्वामींचे समाधीस्थान देखील दुर्लक्षामुळे मोडकळीस आले आहे. रामभट स्वामींनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदानही दिले आहे.हा इतिहास काळाच्या ओघात लुप्त होऊ नये, यासाठी सटमटवाडी येथील युवक दरवर्षी येथे श्रमदानाने साफसफाई मोहीम राबवितात. यातून इतिहासकालीन समाधी व त्याचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न युवक करत आहेत.या स्थळाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. ऐतिहासिक ठेव्याला पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्यासाठी येथील युवकांनी दाखविलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.या दुर्लक्षित पर्यटनस्थळाच्या विकासाची प्रतीक्षा असून या भागाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास या समाधी स्थळाचा इतिहास पुढील पिढीला समजण्यासाठी मदत होणार आहे.समाधीस्थळाविषयी...इतिहासकालीन समाधीस्थळ असलेला परिसर हा बांदा-सटमटवाडी येथील डोंगरमाथ्यावर सुमारे ४५0 फूट उंचीवर आहे. येथून बांदा शहर, झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्ग, डिंगणे गाव, वाफोली धरण व गोव्याचा बराचसा भाग दृष्टीस पडतो.शिवकालीन असलेल्या श्री रामभट स्वामींची समाधी या पर्वतावर आहे. याठिकाणी रामभट स्वामींचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वामींनी जिवंत समाधी घेतल्याचे येथील जाणकार सांगतात. प्रवेशद्वारावर उजव्या बाजूस हनुमान व पाठीमागील बाजूस गणपती दगडामध्ये कोरण्यात आला आहे. या ठिकाणी स्वामींनी आपल्या दैवी शक्तीने गोड्या पाण्याचे तळे निर्माण केले आहे, अशी आख्यायिका आहे. या तळ्यातील पाणी सटमटवाडी येथील मठाकडे व गाळेल येथे गेले आहे. या तळ्याचे अवशेष आजही याठिकाणी सुस्थितीत आहेत. मंदिराच्या लगत समोरील बाजूस स्वामींची तप करण्यासाठी दगडांची बांधकाम असलेली जागा मात्र मोडकळीस आली आहे.स्वामींच्या सेवेसाठी असलेली त्यांची दासी ‘मनकरणी’ हिच्या दगडातील पादुका आजही येथे पहावयास मिळतात. तसेच पर्वताच्या खाली देखील त्यांच्या सेवेकऱ्यांची समाधी पहावयास मिळते. स्वामींचे बरेचसे शिष्य हे महाराष्ट्रात होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेत रामभट स्वामींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शिवाजी महाराजांच्या कालावधीत तळकोकणातील राज्यकारभाराची माहिती सांडणीस्वारांमार्फत पारगडाकडून रायगडावर पाठवली जायची. त्यात स्वामींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.शिवकालीन समाधीस्थळाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या स्थळाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या स्थळाचा इतिहास जगासमोर यावा आणि या परिसराचा विकास व्हावा, याचा ध्यास घेऊन या ठिकाणी श्रमदानाने साफसफाई करण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला. युवकांनी सातत्याने श्रमदान करीत या स्थळाला नवी झळाळी प्राप्त करून दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर याठिकाणी साफसफाई मोहीम राबविण्यात येते.यामध्ये महादेव वसकर, जीवबा वीर, प्रमोद कळंगुटकर, महेंद्र मांजरेकर, विवेक केळुस्कर, विठ्ठल तांबुळकर, सच्चिदानंद मांजरेकर, सूरज मांजरेकर, विठ्ठल केळुस्कर, संजय केळुस्कर, अजिंक्य कळंगुटकर, रामचंद्र तांबुळकर, समीर शिरोडकर, आदी युवकांसह सटमटवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.दरवर्षी याठिकाणी रामभट स्वामींची पुण्यतिथी व पूजा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात येतात. मठ पर्वतावर जाऊन धार्मिक कार्यक्रम करणे शक्य नसल्याने पर्वताच्या खाली मठ बांधण्यात आला आहे. त्याठिकाणी नित्य नेमाने पूजा अर्चा करण्यात येते.पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास : मंदार कल्याणकरया स्थळाच्या विकासासाठी पर्यटन खात्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. या ठिकाणी शालेय विद्यार्थी एकदिवसीय सहलीसाठी येतात. मात्र, योग्य सुविधा नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. या स्थळाकडे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्यांची निर्मिती करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. या स्थळाच्या विकासासाठी माजी सरपंच शीतल राऊळ, सतीश येडवे हे देखील प्रयत्नशील आहेत.
ऐतिहासिक स्थळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 03, 2015 9:26 PM