ठळक मुद्देऐतिहासिक वास्तूच्या दुरवस्थेकडे येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कुडाळवासीय, शिवप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरजबांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षझुडपांच्या मुळांमुळे कठड्याचे नुकसान
रजनीकांत कदम कुडाळ 28 : कुडाळ शहरामध्ये असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक ‘घोडेबाव’ विहिरीचा भाग कोसळत असून, या ऐतिहासिक वास्तूच्या दुरवस्थेकडे येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. घोडेबाव वाचविण्यासाठी आता कुडाळवासीय आणि शिवप्रेमींनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने सिंधुदुर्ग जिल्हा पावन झाला आहे. या जिल्ह्यात शिवकालीन व त्याअगोदरच्या अनेक ऐतिहासिक वास्तू उभ्या आहेत. यामध्ये दुर्ग, गड, भुईकोट किल्ले, प्राचीन विहिरी, मंदिरे, शिल्पे, लेणी या व इतर प्राचीन वास्तंूचा समावेश आहे. निसर्गानेही सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तर या जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्यासह भुईकोट किल्ले तसेच अनेक विहिरी व इतर वास्तू बांधल्या. आजही या वास्तू छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत उभ्या आहेत.
कुडाळ शहरामध्ये ही शिवकालीन ऐतिहासिक घोडेबाव विहीर असून या विहिरीचे पाणी गोडे आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायºया बांधल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यास असलेली ही ऐतिहासिक विहीर आहे. त्या काळात पायºयांचा वापर करून माणसे किंवा घोडे पाणी पिण्यासाठी जात असत. आता मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने या विहिरीच्या पायºयांकडील भाग प्रशासनाने वापराकरिता बंद केला आहे. तर विहिरीच्या कठड्याच्या बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची आता मात्र पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. विहिरीच्या दुरुस्तीकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी पूर्ण दुर्लक्ष केल्याने हा ऐतिहासिक ठेवा अंतिम घटका मोजीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विहिरीचे बांधकाम दिवसेंदिवस ढासळत चालले असून, कठडा कोसळत आहे. विहिरीच्या आतील बांधकामावर वड, पिंपळ तसेच इतर जंगली झुडपांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे या वास्तूचे सौंदर्य हरवत चालले आहे.
झुडपांच्या मुळांमुळे कठड्याचे नुकसान विहिरीत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झुडपांच्या मुळांमुळे कठड्यांचे दगड हालत असून कठडा कोसळण्याचे हे प्रमुख कारण आहे. संंबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही झुडपे वाढल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
डागडुजीकडे दुर्लक्ष या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी दरवर्षी करणे अत्यावश्यक आहे. पण गेल्या काही वर्षांत या विहिरीची डागडुजी केली नसल्याने विहिरीची दुरवस्था झाली आहे.
बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षविशेष बाब म्हणजे, घोडेबाव विहिरीपासून काही अंतरावरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून या विहिरीच्या बाजूनेच सर्व अधिकारी, कर्मचारी ये-जा करतात. असे असूनही या विहिरीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. येथील लोकप्रतिनिधींनीही या ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकामात स्वारस्य दाखविलेले नाही. ‘घोडेबाव’ला नवसंजीवनीची गरज घोडेबाव विहिरीचा कठडा काही प्रमाणात तुटला असला, तरी तातडीने दुरूस्ती आणि साफसफाई केल्यास विहिरीला गतवैभव प्राप्त होऊ शकते. या ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळण्यासाठी गरज आहे ती सकारात्मक दृष्टीकोनाची.
घोडेबाव विहिरीची वैशिष्ट्येजिल्ह्यातील सर्वात मोठा व्यास असलेली ऐतिहासिक विहीरसुबक व रेखीव बांधकामबारा महिने मुबलक पाणीसाठाकुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शिवकालीन ठेवा