नीलेश जाधव -मार्लेश्वर कोकणामध्ये करवंदाला ‘डोंगरची काळी मैना’ असे म्हटले जाते. हे फळ कोणत्याही मेहनतीशिवाय तयार होत असते. गरीबांचा मेवा म्हणूनही करवंदाची ओळख आहे. करवंदाचे फळ मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र असे असतानादेखील डोंगरची ही काळी मैना संशोधनाअभावी आजपर्यंत दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे या काळ्या मैनेवर आता संशोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे.निसर्गाने कोकणाला दिलेली फळाची देणगी म्हणजे करवंद होय. हे फळ तयार होण्यासाठी कोणतीच मेहनत घ्यावी लागत नाही. करवंदाची झाडे मानवाकडून जमिनीत लावली जात नाहीत, तर ही झाडे डोंगरावर व सपाटावर जंगलामध्ये निसर्गत: वाढत असतात. करवंदाचे झाड हे काटेरी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी या झाडाचा उपयोग कुंपण घालण्यासाठी करतात.करवंदाच्या झाडापासून तयार होणारे फळ हे काही अंशी आंबट असते. तेवढेच ते पिकल्यावर गोडही असते. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात करवंदाच्या झाडाला फुले धरतात. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत हिरवीगार फळे धरतात आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये ही करवंदे पिकतात. पूर्ण पिकल्यानंतर ही फळे काळीभोर दिसतात. ग्रामीण भागात तर रानोमाळी पिकणारी ही करवंदे काढण्यासाठीचा आनंद काही औरच असतो.आंबट व गोड चवीची असणारी पिकलेली करवंदे खाल्ल्याशिवाय कोणालाच राहवत नाही. प्रत्येकाला पिकलेली काळीभोर करवंदे खावीशी वाटत असतात. पिकलेली करवंदे खातानाची मजा काही वेगळीच असते.काही ठिकाणी डोंगरात असलेली करवंदाची फळे मोठ्या प्रमाणात वाया जात असतात. त्यामुळे त्यावर योग्य संशोधन होऊन प्रक्रिया केल्यास करवंदांपासून अनेक पदार्थ बनवले जावू शकतात. मात्र, आजपर्यंत या काळ्या मैनेवर संशोधन न झाल्याने हा रानमेवा जणू दुर्लक्षितच राहिला आहे.कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. यामध्ये अनावधानाने करवंदाच्या जाळ्याही तोडल्या जात आहेत. करवंदाच्या जाळ्यांची अशीच कत्तल सुरु राहिल्यास आता प्रत्यक्षात चाखायला मिळणारी करवंदे भविष्यात पाहायलासुद्धा मिळणार नाहीत, अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे कोकणच्या या रानमेव्याचे संवर्धन होणे काळाची गरज बनली आहे.आहे बहुगुणी पण...!पिकलेली करवंदे खाण्याबरोबरच करवंदाचे जामही बनवले जातात तर सरबतही बनवले जाते. कच्च्या करवंदाचे लोणचेही तयार केले जाते. अशाप्रकारे करवंदाच्या फळाचा उपयोग केला जातो. मात्र, असे असले तरी करवंदाच्या फळावर योग्य असे संशोधन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
‘डोंगरची काळी मैना’ संशोधनाअभावी दुर्लक्षित
By admin | Published: March 25, 2015 9:39 PM