सावंतवाडी : तिरोडा येथील आयएलपीएल कंपनीच्या कामगारांनी चक्क पगारवाढीसाठी कंपनीच्या व्यवस्थापकालाच कोंडून घातले. या व्यवस्थापकाला उशिरापर्यंत सोडून न दिल्याने अखेर कंपनीने पोलीस बंदोबस्त मागवून या व्यवस्थापकाच्या सुटकेचा प्रयत्न चालवला. मात्र, आक्रमक कामगारांमुळे पोलिसाचे तसेच कंपनी व्यवस्थापनाचे उशीरा पर्यंत काहीही चालले नाही. तिरोडा येथे आयएलपीएल कंपनीचा मायनिंग व्यवसाय आहे. मात्र, सध्या मायनिंगचे विदेशात दर घटल्याने याचा परिणाम येथील व्यवसायावर सुरू असून, त्यामुळेच कंपनीने यावर्षी कामगाराची पगारवाढ केली नाही. मात्र, कामगारांनी आहे त्या पगारावर काम करण्यास नकार देत पगारवाढ दिलीच पाहिजे, अशी मागणी गेले काही दिवस कामगारांनी लावून धरली होती. मात्र, कंपनी या कामगारांना जास्त दाद देत नव्हती. कंपनीने तिरोडा येथील कंपनीच्या कार्यालयाबाहेर परिपत्रकही लावले होते. त्यात त्यांनी कंपनीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामगारांना यावर्षी पगारवाढ देता येणार नाही, असे यापूर्वीच जाहीर केले होते. असे असताना अचानक शुक्रवारी सायंकाळी कामगारांनी कंपनीचे व्यवस्थापक सुभाष लिंगवत यांना घरी जात असताना कंपनीच्या गेटवरच त्यांची गाडी अडवली व जोपर्यंत पगारवाढीबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत तुम्हाला येथून सोडणार नाही, असे म्हणत लिंगवत यांना धारेवर धरले. मात्र, लिंगवत यांनी पगारवाढ देता येणार नाही. कंपनीच्या वरिष्ठांना याबाबत कळविले असल्याचे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार आक्रमक झाले होते. अखेर लिंगवत यांनी कामगारांच्या तावडीतून सुटका करून घेत थेट स्वत:च्या कार्यालयात जाऊन बसले. मात्र, कामगार तेथेही आले व त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यांनी आम्हाला दिवाळीला पगारवाढ पाहिजेच, अशी मागणी लावून धरत लिंगवत यांना कोंडून घातले. कामगारांचे रौद्ररूप बघून कंपनी व्यवस्थापनाने अखेर पोलिसांची एक कुमक मागवण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तिरोडा येथे रवाना झाले आहेत. मात्र, उशिरापर्यंत कामगार व अधिकारी यांच्यात समन्वय करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत कंपनीचे अधिकारी गिल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंपनी महटल्यावर छोट्या-मोठ्या गोष्टी या होत राहतात. ज्या अधिकाऱ्याला कोंडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना सोडून देण्यात आले आहे, असे यावेळी गिल यांनी सांगितले. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, कंपनीच्या कामगारांनी पगारवाढीबाबत काही प्रश्न उपस्थित केले असून, अधिकाऱ्याला कोंडल्याने आम्ही घटनास्थळी जाऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘आयएलपीएल’च्या अधिकाऱ्याला कोंडले
By admin | Published: November 06, 2015 11:10 PM