बांदा : गोवा बनावटीच्या दारुची कारमधून विनापरवाना वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने वाफोली येथे थरारक पाठलाग करुन कारवाई केली. या कारवाईत ६७ हजार ३५0 रुपये किमतीच्या दारुसह १ लाख २ हजार ३५0 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला.याप्रकरणी कार चालक सूर्यकांत तुकाराम गवस (वय ४0, रा. शाहूनगर, बेळगाव) याच्यावर अटकेची कारवाई केली. ही कारवाई रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. चालक सूर्यकांत गवस हा अवैध दारु वाहतूक करण्यात सराईत आहे. त्याने यापूर्वी अनेकवेळा गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केली आहे.रविवारी पहाटे उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यक निरीक्षक रमेश चाटे, एस. व्हि. भागवत, एस. के. दळवी, एच. आर. वस्त, एम. डी. पाटील, प्रसाद माळी, पुंडलिक बिरुमणी हे बांदा दाणोली मार्गावर वाफोली सोसायटीनजीक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी गोव्याहून दाणोलीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती ८00 कारला (जीए 0२ ए ९४३५) थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, कार चालकाने तपासणी पथकाला हूल देत पलायन करण्याचा प्रयत्न केला.पथकाने त्यानंतर कारचा पाठलाग केला. वाफोली धरणाच्या अलिकडे कार चिखलात रुतल्याने चालक पथकाच्या हाती लागला. कारच्या पाठीमागील सिटवर तसेच मागील डिकीमध्ये गोवा बनावटीची दारु आढळली. पथकाने डिएसपी ब्लॅक स्पेशल व्हिस्कीचे ५ बॉक्स, मॅकडॉल नंबर १ सेलिब्रेशन थ्री एक्स रमचे ३ बॉक्स, आयबी ब्रॅण्डचा एक बॉक्स, बॅगपायपर व्हिस्कीचे २ बॉक्स, आँरेंज व्होडकाचे ३ बॉक्स, हनीगाईड ब्रॅण्डीचे १ बॉक्स, मॅकडॉल नंबर १ व्हिस्कीचा १ बॉक्स अशी एकूण ६७ हजार ३५0 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु व ३५ हजार रुपये किमतीची कार जप्त केली.या घटनेचा अधिक तपास दुय्यक निरीक्षक रमेश चाटे करीत आहेत. (प्रतिनिधी)
अवैध दारु वाहतुकीवर कारवाइ
By admin | Published: July 06, 2014 11:13 PM