ओरोस : मोठ्या जल्लोषात ‘बाप्पाच्या जयजयकारा’च्या गजरात रविवारी जिल्ह्यातील दीड दिवसाच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. उशिरापर्यंत बाप्पाला निरोप देण्यात येत होता. जिल्ह्यातील दीड दिवसाच्या सुमारे १७ हजार घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत बाप्पांना निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ’ असे सांगत निरोप घेण्यात आला.श्री गणरायांची गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ३२ सार्वजनिक, तर ७२ हजार ७८९ घरगुती गणरायाची स्थापना करण्यात आली होती. रविवारी जिल्ह्यातील दीड दिवसाच्या गणपतींची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. सायंकाळपासून सुरू झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 'एक दोन तीन चार... गणपतीचा जय जयकार' ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर सर्वत्र ऐकू येत होता. रात्री उशिरापर्यंत तलाव, नद्या आणि गणेश घाटावर मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते. विसर्जन स्थळांवर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस तैनात असून भाविकांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात आले.
जिल्ह्यात शनिवारी गणरायांचे थाटात आगमन झाले होते. त्यानंतर भजन, आरती, फुगड्या घातल्या जात आहेत. गावागावात भक्तिमय वातावरण पसरले आहे. महिलावर्गही गावागावात फुगड्यांचे संघ घेऊन जात तेथे पारंपरिक फुगड्यांचे प्रकारांची प्रदर्शन घडवत आहेत. त्यामुळे गावागावात चैतन्यमय वातावरण पसरले आहे.गणरायांची सेवारविवारी दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जड अंतकरणाने भाविकांनी गणरायांना निरोप दिला. गणेश उत्सवाच्या निमित्ताने गावागावात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दीड, पाच, सात, अकरा दिवस गणरायांची सेवा सर्वांच्या हातून घडणार आहे.