सिंधुदुर्ग : उष्णतेची तीव्र लाट सध्या सुरू आहे. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडावे लागते. ते उन्हातून जेव्हा घरी येतात तेव्हा सर्वात प्रथम फ्रीजमधील थंड पाणी पितात; परंतु असे केल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.उन्हाळ्यात थंड पाणी पिल्याने काही लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात लिक्विड ड्रिंक्सचे सेवन केले जाते. यामध्ये पाण्यासोबतच लस्सी, ज्यूस, नारळपाणी, लिंबू सरबत अशी विविध प्रकारची पेये येतात. उन्हाळ्यात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे; परंतु पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजमधील पाणी पितात. तहान शमविण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी थंड पाणी पिले जाते; परंतु त्यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला, तरी त्यामुळे खूप नुकसानही होते.
उन्हाळा लागल्याची लक्षणे काय?उन्हाळा लागल्यास शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते. यालाच आपण उन्हाळा लागणे असे म्हणतो. उन्हाळा लागल्यास मूत्रमार्गाची जळजळ होते; तसेच थकवा येतो. अंतर्गत दाह निर्माण होतो.
उन्हातून आल्यावर घ्या काळजीउन्हातून घरी आल्यावर लगेच एसी किवा कूलरमध्ये बसू नये. शरीराला वेगवेगळ्या तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे एसी असल्यास त्याचे तापमान कमी ठेवा.
उन्हात बाहेर पडताना अशी घ्या काळजीउन्हात जाण्याअगोदर उपाशीपोटी बाहेर पडू नये. त्यामुळे घरून निघताना नाश्ता किंवा जेवण करूनच बाहेर पडले पाहिजे. आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत ३ ते ४ लिटरपर्यंत पाणी लागते. उन्हाळी लागण्याचा त्रास मुख्यत्वे पाणी कमी पिल्याने होतो. त्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. - डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग.