सावंतवाडी: व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. सावंतवाडी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचा व्हाटसप ग्रुप असून या ग्रुप मध्ये पुंडलिक दळवीसह मारहाण करणारे युवक चा समावेश आहे.मात्र मारहाण करणारा युवक हा ग्रुपमध्ये वारंवार चुकीचे संदेश पाठवत असल्यामुळे दळवी यांनी आजच त्याला ग्रुप मधून काढून टाकले होते.
याच रागातून या युवकांने मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन दळवी यांचे उभाबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यालय गाठून दळवी यांना जाब विचारला तसेच आपल्याला ग्रुप मधून का बाहेर काढले ? असा सवाल केला त्याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यातूनच त्याने दळवी यांच्या शर्टाला हात घालत हाताच्या थापटांनी मारहाण केली.
यावेळी दोघांत चांगलीच झटापट ही झाली पण मारहाण करणाऱ्या सोबत मनसेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या सगळ्याना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तसेच घटनेनंतर दळवी यांनी मारहाण झालेल्या अवस्थेत पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या समोर मांडली यात त्यांनी आपणास कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देत सोनसाखळी तोडण्यात आल्याची तक्रार दिली आहे.
मात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली.तर मारहाण करणाऱ्याना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले.घटनेनंतर मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत घटनेत सहभागी कार्यकर्त्यांची चौकशी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात पोलीस ठाण्यात
तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मारहाण झाल्याचे समजताच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. जिल्हाध्यक्ष अमित सामंत व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ही पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी चर्चा केली व संशयितांवर कठोर कारवाई ची मागणी केली. भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट
तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मारहाण झाल्याचे समजताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब तसेच शहराध्यक्ष अजय गोंदावले,अॅड.अनिल निरवडेकर,हेमंत बांदेकर यांचा समावेश होता.