सावंतवाडी : फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, या पोलिस अधिकाऱ्यांला एक लाखाची लाच स्वीकारताना रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, तर पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील हे कामानिमित्त बाहेर असून ते सध्या नजरकैदेत आहेत. लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळ च्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोघांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी अशोक पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिध्दांत परब सह अमित पास्ते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्य़ागुन्ह्य़ातील संशयित आरोपी सिध्दांत परब याला उच्च न्यायालयात दोन दिवसांपूर्वीच जामिन मंजूर झाला असून मात्र अमित पास्ते याला अद्याप अटक करण्यात आली नाही त्याची अटक टाळण्यासाठी सिध्दांत परब याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे सतत दबाव आणत होते.
या दबावाला वैतागलेल्या सिध्दांत परब यांनी 8 ऑक्टोबर ला रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीवरून रायगड येथील लाचलुचपत चे पथक पाच दिवसापूर्वीच सावंतवाडीत दाखल झाले होते.या तक्रारीच्या अनुषंगाने खंडागळे व पाटील यांनी तक्रारदार यांच्याशी केलेला संवाद लाचलुचपत विभागाने रेकॉर्ड केला होते त्या रेकॉर्ड मध्ये या तपास अधिकाऱ्यांनी अमित पास्ते यांची अटक टाळण्यासाठी तसेच तपास कामात सहकार्य करण्यात यावे यासाठी दिड लाख रूपयांची लाच मागितल्याचे रेकॉर्डिंग मध्ये दिसून आले होते.
त्यातील एक लाख रूपयांची लाच येथील पोलीस ठाण्यात सिध्दांत परब यांच्याकडून गुरूवारी सायंकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे हे स्वीकारत असतानाच रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याना रंगेहाथ पकडले.तर यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या शासकीय दौऱ्यात असल्याने त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे,पोलिस उपनिरीक्षक विनोद जाधव,महेश पाटील कौस्तुभ मगर विवेक खंडागळे आदिनी केली आहे.